रणजी पराक्रम

जयेंद्र लोंढे,[email protected]

अस्सल मुंबईकर… खडूस प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि विदर्भचा पठ्ठय़ा सिव्हील इंजिनीयर रजनीश गुरबानी यांनी रणजी क्रिकेट स्पर्धा गाजवली आहे. यामागे दोघांचेही वेगळेपण आणि प्रचंड परिश्रम आहेत. दोघांशी साधलेला संवाद…

इयत्ता दहावीपर्यंत मुंबईत वास्तव्य होते. सेंट मेरी हायस्कूलमध्ये ऍथलेटिक्स, फुटबॉल व क्रिकेट या तिन्ही प्रकारांत खेळायचो. एल्फ वेंगसरकर क्रिकेट ऍकॅडमीत क्रिकेटचे बारकावे आत्मसात केले. मात्र वडील रेल्वेमध्ये नोकरी करीत असल्यामुळे बदलीनंतर आम्हाला नागपूरला जावे लागले. तिथे गेल्यानंतर प्रशांत कानतोडे व प्रशांत बाबल या सरांच्या मार्गदर्शनामुळे पुन्हा क्रिकेटकडे वळलो असे रजनीश गुरबानी यावेळी म्हणाला.

आई-वडिलांचा सपोर्ट नसता तर इंजिनीअरिंग व क्रिकेट या दोन्ही बाबी योग्य पद्धतीने सांभाळताच आल्या नसत्या. कोणत्याही एका करीअरवर पाणी सोडावे लागले असते हे निश्चित आहे. इंजिनीअरिंग व क्रिकेट या दोन्ही गोष्टी मी व्यवस्थितरीत्या कशा केल्या याचेही कोडे अद्याप मला उलगडलेले नाही, पण आई-वडिलांमुळेच मला इथपर्यंत मजल मारता आली असे भावुक उद्गार रजनीश गुरबानीने यावेळी काढले.

गोलंदाज व्हायचे की फलंदाज याबाबत जास्त विचार केला नाही. विविध वयोगटांत खेळत असताना दोन्ही बाजू करायच्या हे ठरवलेले असायचे. शिवाय कर्णधार असल्यामुळे फलंदाजी व गोलंदाजी या दोन्हींमध्ये चमकदार कामगिरी करण्याचा दबाव असायचा, असे विदर्भाचा पठ्ठय़ा पुढे नमूद करतो.

विदर्भ क्रिकेट संघाने यंदाच्या रणजी मोसमात कात टाकलीय याचे श्रेय प्रशिक्षकांसोबत खेळाडूंनाही जाते. हा मोसम सुरू होण्याआधी प्रशिक्षकांनी कशा प्रकारे सराव करवून घेतला याबाबत त्याला विचारले असता तो म्हणाला, मोसम सुरू होण्याच्या दोन महिने आधी कसून सराव केला. पहाटे सहा वाजल्यापासून विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये फिटनेसचा सराव व्हायचा. तसेच साडेआठ वाजल्यानंतर अकरा वाजेपर्यंत आंबेडकर क्लबमध्ये खेळाच्या तांत्रिक बाबींवर लक्ष दिले जात होते.

सुब्रतो बॅनर्जी व चंद्रकांत पंडित या दोन दिग्गज व्यक्तींच्या परीसस्पर्शामुळे मला रणजीत धमक दाखवता आली. एखाद्या लढतीत पाच बळी मिळवल्यानंतरही दोघांनी मला हॉटेलच्या रूममध्ये बसून छोटय़ा छोटय़ा बाबींवर लक्ष द्यायला सांगितले. त्यामुळे मी समाधानी राहिलो नाही. आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी सरसावलो. त्याचा फायदा आता मला झाला आहे, असे न विसरता तो सांगतो.

चंद्रकांत पंडित आम्हाला जवळपास प्रत्येक सामन्याआधी महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्या ‘प्रेरणादायी स्पीच’चे व्हिडीओ दाखवून  प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही याची शिकवण मिळते. मुंबईच्या संघातला खडूसपणा आमच्यामध्ये आता निर्माण होऊ लागलाय, असेही तो सांगतो.

आता कुठपर्यंत मजल मारायची हे ठरवलेले नाही. सध्या रणजी स्पर्धेच्या फायनलचाच विचार मनामध्ये सुरू आहे. वयाच्या आठव्या वर्षापासूनच हिंदुस्थानसाठी खेळायचे हे स्वप्न बघितले होते. त्यामुळे तो ध्यास आजही आहे, पण जास्त पुढचा विचार करीत नाही. टप्प्याटप्प्याने प्रगती करायची आहे, असे तो शेवटी आवर्जून सांगतो.

विदर्भाच्या क्रिकेटपटूंच्या सरावाबाबत विचारले असता चंद्रकांत पंडित म्हणाले,  कडक शिस्तीसाठी मला ओळखले जाते. खेळाडूंची बेशिस्त वर्तणूक मला आवडत नाही. मात्र क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. अशा परिस्थितीत सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याकडे माझा कल असतो. तसेच कोणाएका खेळाडूवर अवलंबून राहायला मला आवडत नाही. संघातील सर्वांनीच आपली जबाबदारी ओळखायला हवी असे त्यांना वाटते.

कर्नाटकसारख्या बलाढय़ संघाला उपांत्य फेरीत हरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱया रजनीश गुरबानीबद्दल चंद्रकांत पंडित यांनी सांगितले की, रजनीश हा युवा खेळाडू असून मागील मोसमात त्याने पदार्पण केले. त्याला प्रत्येक लढतीत खेळवता आले नसले तरी जेव्हा त्याला संधी देण्यात आली तेव्हा त्याने आपली चुणूक दाखवलीय. पंजाब व बंगालविरुद्धच्या लढतीत त्याने महत्त्वाच्या क्षणी विदर्भासाठी मोलाची कामगिरी बजावलीय. त्याच्याकडे वेग नाही, पण दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची कला उत्तम आहे. त्यामुळे निवड समितीने  गांभीर्याने विचार केल्यास तो आगामी काळात हिंदुस्थानसाठीही खेळू शकतो.

 मुंबईतील क्रिकेटपटूंना ‘खडूस’ या नावाने ओळखले जाते. ‘खडूस’ म्हणजे प्रतिस्पर्ध्यांना शेवटपर्यंत टक्कर देण्याचे कसब,  मैदानावरील जिद्द. मी मुंबईचा असल्यामुळे माझ्यामध्येही ही कला आपसूकच आलीय. विदर्भाच्या खेळाडूंमध्ये ती यायला थोडा वेळ लागेल. मात्र सुरुवात तर झालीय. पंजाब, बंगाल व हिमाचल प्रदेशविरुद्धच्या लढतीत याचा प्रत्यय दिसून आला असे चंद्रकांत पंडित यांनी आवर्जून नमूद केले.

खरे तर फायनल जिंकल्यानंतर मैदानात धावत जाऊन खेळाडूंना मिठी मारली जाते, पण उपांत्य लढत जिंकल्यानंतरच भावुक झालो. अखेरच्या क्षणापर्यंत विदर्भाच्या खेळाडूंनी हार मानली नाही आणि विजय खेचून आणला हे पाहून आनंद गगनात मावेनासा झाला होता. यावेळी या खेळाडूंचे कौतुक करावे तेवढे कमी आहे अशा शब्दांत त्यांनी आपले मत व्यक्त केले.

कर्नाटकविरुद्धची लढाई आम्ही जिंकलो, पण आता पुढील सामना आमच्यासमोर उभा ठाकला आहे. अंतिम फेरीत कोणत्या संघाचा सामना करायचा आहे याकडे आमचे लक्ष नाही. शिवाय फायनल लढतीचा कोणताही दबावही अंगावर घेणार नाही. उपांत्यपूर्व व उपांत्य फेरी जिंकल्यानंतर खेळाडूंच्या आत्मविश्वासात कमालीची वाढ झालीय एवढं मात्र नक्की असे ते स्पष्टपणे सांगतात.

एक क्रिकेटपटू म्हणून स्वतबद्दल सांगताना चंद्रकांत पंडित म्हणाले, हिंदुस्थानसाठी खेळायला मिळाल्यामुळे भाग्यवान समजतो. मुंबईच्या १९ वर्षांखालील संघाचे तसेच मफतलाल संघाचे नेतृत्व मी केले. तसेच हिंदुस्थानच्या १९ वर्षांखालील संघामध्येही माझा समावेश होता. दिग्गज खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करता आल्याने नशीबवान समजतो.

रणजीसह स्थानिक स्पर्धा व आंतरराष्ट्रीय क्रिकेट यांमधील फरक चंद्रकांत पंडित यांनी आपल्या नजरेतून सांगितला तो असा- ‘रणजीसारख्या स्थानिक स्पर्धांमध्ये खेळताना प्रेशर तेवढे नसते, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना कोटी कोटी क्रिकेटप्रेमींच्या नजरा तुमच्यावर खिळलेल्या असतात. त्यामुळे दबाव हा येतोच. त्यामध्ये खेळाडूंचे मानसिक संतुलन, जिगर यावर सर्वकाही अवलंबून असते. त्यानंतरच एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदीर्घ काळ टिकून राहू शकतो.’