‘पद्मावत’ झळकल्यास हिंसाचार घडेल, करणी सेनेचा शेवटचा इशारा

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पद्मावत चित्रपटावरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली असली तरी आमचा विरोध कायम राहणार आहे. तसेच पद्मावत बॉक्स ऑफिसवर झळकला तर देशात हिंसाचार होईल, असा इशारा करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह यांनी दिला आहे. तसेच आम्ही कायद्याला घाबरत नाही असेही ते म्हणाले.

पद्मावत चित्रपटावर राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि हरयाणा या चार राज्यांनी घातलेली बंदी चुकीची ठरवत सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवण्याचे आज आदेश दिले. त्यानंतर काही वेळातच करणी सेनेने याला विरोध दर्शवला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना करणी सेनेचे अजय सिंह यांनी सर्वोच्च न्यायलयचा हा निर्णय आम्हाला अमान्य असून चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. ख्रिश्चन, मुसलमानांनी आक्षेप घेतल्यानंतर तात्काळ चित्रपटावर बंदी येते मात्र हिंदू समाजावर अन्याय केला जातो. हिंदूंच्या भावनांची कदर केली जात नाही, असेही ते यावेळी म्हणाले. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारचा आम्ही निषेध करतो. या चित्रपट प्रदर्शनाविरोधात आम्ही २५ जानेवारी रोजी जेलभरो आंदोलन करणार आहोत, तसेच गणतंत्र दिवसाच्या कार्यक्रमावर देखील आमचा बहिष्कार असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोदी पुढल्यावेळी हिंदूंची मतं मिळणार नाही!

नरेंद्र मोदी यांना हिंदुत्वासाठी आम्ही मतं दिली. मात्र इथे हिंदूंची गळचेपी सुरू आहे. त्यामुळे पुढल्यावेळी हिंदूंची मतं मागायला येऊ नका, तुम्हाला ही मतं मिळणार नाही, असेही अजय सिंह म्हणाले.

छत्तिसगडमध्ये राजपूत समाजाने दिले पत्र

छत्तिसगडमध्ये राजपूत समाजाच्या प्रतिनिधी मंडळाने राज्याच्या गृहमत्र्यांना एक पत्र दिले आहे. ज्यामध्ये पद्मावतवर बंदी घालण्याची विनंती केली आहे. गृहमंत्र्यांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर या प्रतिनिधी मंडळाने इशारा दिली की, राज्यात कुठेही चित्रपट झळकल्यास स्क्रीन पेटवून देऊ, ही शेवटची चेतावणी आहे, असेही ते म्हणाले.