राजस्थानात विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये जीन्स घालण्यावर बंदी

प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । जयपूर

देशभरात महिला दिन जल्लोष साजरा होत असताना राजस्थानाच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या सरकारने मात्र महिलांच्याच हक्कांवर गदा आणणारा एक आदेश जारी केला आहे. भाजपने राजस्थानातील महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींवर जीन्स आणि टीशर्ट घालण्याची बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थिनींमध्ये व महिलांमध्ये संताप व्यक्त होत आहे. राजस्थानातील १४८ महाविद्यालयांमधील १ लाख ८६ हजार विद्यार्थिनींना या बंदीचा फटका बसणार आहे. येत्या २०१८-१९ च्या शैक्षणिक वर्षापासून ही बंदी लागू करण्यात येणार आहे.

राजस्थान सरकारने काढलेल्या नवीन नियमांनुसार विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये फक्त पंजाबी ड्रेस किंवा साडी घालून येण्याची सक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थिनींनी कोणत्या रंगाचे पंजाबी ड्रेस घालायचे याचा निर्णय महाविद्यालयाने व विद्यार्थी संघटनांनी एकत्र घेण्यास सरकारने सांगितले आहे. सरकारने जीन्स आणि टीशर्ट व्यतिरिक्तही अन्य प्रकारच्या फॅशनेबल कपड्यांवरही बंदी घातली आहे. तसेच ज्या विद्यार्थिनी या नियमांचे उल्लंघन करणार त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

राजस्थानचे उच्च शिक्षण मंत्री किरण महेश्वरी यांनी या वृत्ताला ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीकडे दुजोरा दिला आहे. ‘महाविद्यालयांमध्ये शिस्त राहावी, वातावरण चांगले राहावे म्हणून आम्ही हा निर्णय घेतल्याचे, महेश्वरी यांनी सांगितले आहे. याआधीही दिल्ली विद्यापीठात आणि पंजाबमधील काही कॉलेजांमध्ये विद्यार्थिनींना जीन्स टीशर्ट घालण्यावर बंदी घातलेली आहे.