गुजरातमध्ये सत्तांतर होऊ शकते – राजू शेट्टी

सामना ऑनलाईन । पंढरपूर

गुजरातमध्ये भाजपची २२ वर्ष सत्ता आहे. मात्र तेथील शेतकऱ्यांची स्थिती चांगली नाही. वरवर सगळं आलबेल दिसत असलं तरी तसं नसून तिथे सत्तांतर देखील होऊ शकतं, अशी शक्यता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंढरपूर येथे ऊस परिषदेचे आयोजन केले आहे. यावेळी राजू शेट्टी यांनी भाजपवर सडकून टीका केली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत भाजपची कोंडी करतच राहणार, असे देखील त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले आहे.

‘गुजरातमध्ये पुन्हा भाजपच निवडून येईल असे चित्र तयार करण्यात आले आहे. मात्र खरी परिस्थिती वेगळी आहे. तिथे सलग २२ वर्ष एकाच पक्षाची सत्ता आहे. तेथील जनतेला बदल हवा आहे. तसेच सध्या तेथील जनतेत भाजपविरोधीच चर्चा आहे. त्यामुळे यावेळी गुजरातमध्ये सत्तांतर देखील होऊ शकतं’ असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी भाजप विरोधात गुजरातमध्ये जाऊन प्रचार करण्याची तयारी दर्शवली आहे. ‘जर भाजपच्या उमेदवारांविरोधात स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार उभे असतील तर त्या उमेदवारांसाठी मी तिथे जाऊन प्रचार करेन’, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.