मोदींवरील लघुपट शाळांमध्ये दाखवण्याचा फतवा म्हणजे हिटलरशाही!

सामना ऑनलाईन । मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारीत ‘चलो जीते हैं’ हा लघुपट शाळेमध्ये दाखविण्याबात शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सूचना दिल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक शिक्षकांनी याला विरोध केला असून राजकिय क्षेत्रात या बाबत विरोधकांनी सरकारवर  टिका केली आहे.

देशात लोकशाही असतांना अशा प्रकारचे शाळांना आदेश देणे म्हणजे हिटलरशाही आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिवनावरील ‘चलो जीते हैं’ हा लघुपट दाखवण्याचा नवा फतवा महाराष्ट्रातील शाळांसाठी काढण्यात आला आहे. हा लघुपट विद्यार्थ्यांना दाखवण्यास काही राज्यांनी नकार दिल्यानंतर वाद निर्माण होता. मात्र हाच लघुपट महाराष्ट्रातील शाळांमध्ये दाखवण्याबाबत काढण्यात आलेल्या फतव्यामुळे राजकारण तापलं आहे.