…आता थांबायचं नाय!

सामना ऑनलाईन । कोलकाता

‘फिफा’ अंडर-१७ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या यशस्वी संयोजनाने हिंदुस्थानात फुटबॉलचे नवे पर्व सुरू झालेय. भविष्यात आपला संघ ‘फिफा’ विश्वचषकाची पात्रता स्वबळावर मिळवेल, असा विश्वास व्यक्त करीत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी कुमार विश्वचषकाचे संयोजन ही तर फक्त सुरुवात आहे. आता आपण थांबायचे नाहीय, फुटबॉलच्या प्रसार आणि प्रसारासाठी जे जे करता येईल ते सर्व क्रीडा मंत्रालय करील, असे आश्वासन दिले.

कोलकाता येथील कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाला केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या विश्वचषकाने हिंदुस्थान ‘फिफा’च्या आणि जागतिक फुटबॉलच्या रडारवर आलाय. देशातील उदयोन्मुख फुटबॉलपटूंसाठी ही स्पर्धा मोठी पर्वणीच ठरलीय. त्यांनी या संधीचे सोने करायला हवे, असेही आवाहन राठोड यांनी केले.

खेळाला सुविधा आणि आर्थिक निधी मिळाला की आंतरराष्ट्रीय स्पर्धांत पदके मिळवता येतात ही मानसिकता सोडली तर हिंदुस्थानी क्रीडापटूंना भविष्यात उज्ज्वल यश मिळवता येईल असा मला विश्वास आहे.

राज्यवर्धन राठोड, केंद्रीय क्रीडामंत्री

फुटबॉल विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार

‘फिफा’ विश्वचषकाच्या यजमानपदाआधी फुटबॉल फक्त ईशान्येकडील राज्ये, बंगाल, केरळ आणि गोव्यापुरताच लोकप्रिय होता, पण कुमार विश्वचषकाने फुटबॉलची गोडी अवघ्या देशात नेलीय. या स्पर्धेला मिळालेला देशातील फुटबॉलशौकिनांचा प्रतिसाद अपूर्वच होता. या खेळाच्या लोकप्रियतेसाठी व विकासासाठी देशभरात हायटेक पायाभूत सुविधा पुरवल्या जातील आणि उदयोन्मुख फुटबॉलपटूंना आवश्यक ते सर्व सहकार्य क्रीडा मंत्रालय करील, असे वचनही अथेन्स ऑलिम्पिकमध्ये देशाला नेमबाजीचे रौप्यपदक मिळवून देणारे राठोड यांनी दिले.

हा तर देशाचा गौरव

‘फिफा’ अंडर-१७ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भूषवायला मिळणे हा हिंदुस्थानचा गौरवच आहे. यापुढे फुटबॉलसह अन्य खेळांच्या मोठय़ा स्पर्धाही आपण समर्थपणे आयोजित करू शकतो, असे सांगून क्रीडामंत्री राठोड यांनी यापुढे फिफा अंडर-२० विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचेही यजमानपद हिंदुस्थानला मिळेल अशी आशा व्यक्त केली. अशा यजमानपदाची संधी मिळणे हा देशाचाच गौरव आहे, असेही प्रतिपादन क्रीडामंत्री राठोड यांनी केले.

यशस्वी सांगता!

जगभरातील प्रतिभाशाली नव्या दमाच्या फुटबॉलपटूंचे जबरदस्त कौशल्य, अफलातून कामगिरी, खेळाडूंचा सळसळता उत्साह, हिंदुस्थानी फुटबॉलशौकिनांचा जल्लोष आणि अनेक विक्रमांनी फिफा कुमार (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. हिंदुस्थानात प्रथमच आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा खऱया अर्थाने संस्मरणीय ठरली.

हिंदुस्थानच्या सहा शहरांमध्ये पार पडलेल्या कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे शनिवारी सूप वाजले. इंग्लिश प्रीमियर लीगमधील आघाडीच्या क्लबमधील खेळाडूंनी सजलेल्या इंग्लंडने किताबी लढतीत बलाढय़ स्पेनला ५-२ गोलफरकाने धूळ चारून नवे कुमार जगज्जेते होण्याचा बहुमान मिळविला. ही जेतेपदाची लढत संपूर्ण लढतीतील सर्वोत्तम लढत ठरली. या स्पर्धेत अनेक घडामोडी या प्रथमच घडल्या हे विशेष. यात युरोपियन संघांमध्ये प्रथमच अंतिम लढत झाली. इंग्लंड व स्पेन संघातील खेळाडूंनी उच्च दर्जाचा खेळ करून स्पर्धेला नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यास कुठलीच कसर सोडली नाही. इंग्लंडने प्रथमच ही स्पर्धा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली तर दुसरीकडे स्पेनला १९९१, २००३ व २००७ नंतर पुन्हा एकदा उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. इंग्लंडने मेक्सिको, अमेरिका व ब्राझीलसारख्या बलाढय़ संघांना पराजित करून फायनलपर्यंतचा प्रवास केला होता. हिंदुस्थानी फुटबॉलशौकिनांनी या स्पर्धेची रंगत वाढविण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. ही कुमार विश्वचषक स्पर्धा हिंदुस्थानात फुटबॉलची क्रेझ वाढविण्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे असे अनेक तज्ञ मंडळींना वाटते.