राखी सावंतला धोबीपछाड; कुस्तीच्या आखाडय़ातून थेट हॉस्पिटलमध्ये दाखल

1

सामना ऑनलाईन । पंचकुला

वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारी राखी सावंत पुन्हा एकदा नवे प्रकरण घेऊन समोर आली आहे. हरियाणातील रेसलिंग स्पर्धेत एका महिला कुस्तीपटूने दिलेले आव्हान राखीला महागात पडले आहे. या खेळात राखीला दुखापत झाली असून तिला थेट हॅस्पिटल गाठावे लागले आहे.

हरियाणातील पंचकुला येथील ताऊदेवी लाल स्टेडियममध्ये ग्रेट खली आयोजित रेसलिंग शोचे आयोजन करण्यात आले होते. बिग फाईटमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत राखीने विजयी महिला कुस्तीपटूला आव्हान करत तिच्याशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला. मात्र राखीला हे आव्हान महागात पडले असून विदेशी महिला कुस्तीपटूने राखीला धोबीपछाड केलं आहे.

स्पर्धेत विदेशी कुस्तीपटू रैवलने फाईट जिंकल्यानंतर ‘कुण्या महिलेत हिंमत असेल तर तिने माझ्याशी लढावे’, असं ओपन चॅलेंज दिले. तिचं हे चॅलेंज ऐकताच राखीने तिला प्रतिआव्हान देत ‘तुझ्यात दम असेल तर तू माझ्यासारखं नाचून दाखव’ असं सांगितलं. त्यानंतर राखीने डान्स करण्यास सुरुवात केली. मात्र तिचा डान्स पाहत असताना अनेकांनी राखीला चीअरअप करत रैवलनला ठेंगा दाखवत चिडवले. हा राग मनात धरत रैवलनने राखीला हवेत उचलून जोरात जमिनीवर आपटले. राखी किमान 5 ते 8 मिनिटं रिंगमध्ये वेदनेने कळवळत होती. पण आयोजकांना ही गोष्ट लक्षात आली नाही. मात्र, राखीला दुखापत झाल्याचं कळल्यानंतर लगेचच तिला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, अशी माहिती आयोजक समितीचे सदस्य बलवान यांनी दिली.