लोकल खोळंब्यामुळे रक्षाबंधनासाठी घराबाहेर पडलेल्या बहिणींचे हाल! 

रक्षाबंधननिमित्त भावाकडे जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या बहिणींचे आज मध्य रेल्वे मार्गावरील लोकल खोळंब्यामुळे चांगलेच हाल झाले. सकाळी नेरळ-वांगणी दरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटल्याने जवळपास अर्धा तास तर सायंकाळी कर्जत येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल गाडय़ांचा मोठा खोळंबा झाली. त्यामुळे सकाळपासूनच विलंबाने धावणाऱया गाडय़ांना दिवसभर लेटमार्क कायम होता, तर सायंकाळी त्यामध्ये आणखी भर पडल्याने सर्व स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. रक्षाबंधनासाठी आज सकाळी नऊच्या आधी आणि सायंकाळी नऊनंतरचा मुहूर्त होता. त्यामुळे अनेक बहिणी सकाळीच आपल्या भाऊरायाला राखी बांधण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र त्याचवेळी मध्य रेल्वेवर मालगाडीचे कपलिंग तुटल्याने कल्याणहून कर्जतच्या दिशेने जाणारी वाहतूक जवळपास अर्धा तास विस्कळीत झाली होती. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कर्जत येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक जवळपास अर्धा तास ठप्प झाली होती.