धर्मांतर घोषणेचा शुक्रवारी वर्धापन दिन, येवल्यात भव्य रॅली

1

सामना प्रतिनिधी, येवला

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर, १९३५ साली येवल्यातील मुक्तीभूमी येथे धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली होती. या घोषणेचा ८२ वा वर्धापन दिन शुक्रवार दि. १३ ऑक्टोबर रोजी रिपाइं बौद्ध महासभा तसेच आंबेडकरी चळवळीच्या संघटनाच्या वतीने सभा मेळावे तसेच धार्मिक असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या वेळी लाखो भीमसैनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येवल्यात दाखल होणार आहेत.

सदर कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइं नेते रामदास आठवले, आमदार जोगेंद्र कवाडे, अॅड. प्रकाश आंबेडकर तसेच मनोज संसारे, भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यशा मिराताई आंबेडकर, महासभेचे प्रवत्ते भीमराव आंबेडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सर्वच नेते मंडळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार असून नेते सभेला संबोधित करणार आहेत. दरम्यान दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सकाळी १० वा. ध्वजारोहन, प्रभात फेरी, श्रामनेर शिबिरार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप, समता सैनिक दलाचा मान वंदनेचा कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सरकाला विद्युत रोषणाई करण्यात आली असून नगरपालिकेने स्वच्छते बरोबरच इतर सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. येथील परिसर निळामय झाला असून विघुत रोषणाइने झळकू लागल्याची माहिती रिपाइं नेते भगवान साबळे स्मारक समितीचे व्यवस्थापक शिद्धोधन तायडे यांनी दिली.