रामाने केलं होतं सीतेचं अपहरण, शिक्षण मंडळ डोक्यावर पडलं आहे काय?


सामना ऑनलाईन । गांधीनगर

रामायणाची गोष्ट आबालवृद्धांना माहीत आहे. प्रभू रामचंद्रांचा १४ वर्षांचा वनवास, रावणाने केलेलं सीतेचं अपहरण आणि श्रीरामांनी केलेला रावणाचा वध.. ही गोष्ट ऐकत अनेकजण लहानाचे मोठे झाले आहेत. पण, गुजरातमध्ये संस्कृतच्या पाठ्यपुस्तकाने मात्र रामाने सीतेचं अपहरण केल्याचा अजब शोध लावला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात बोर्डाच्या १२ वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकात सीतेचं अपहरण रामाने केल्याचा उल्लेख आहे. संस्कृत साहित्याचा परिचय करून देणाऱ्या या पुस्तकाच्या १०६ क्रमांकाच्या पानावर एक परिच्छेद आहे. यात असं लिहिलं आहे की, ”इथे कवीने त्यांच्या अमूल्य विचारांच्या आधारावर रामाच्या चरित्राचे एक सुंदर चित्र सादर केलं आहे. जेव्हा राम सीतेचं अपहरण करतात, तेव्हा लक्ष्मण हा संदेश प्रभू रामचंद्रांना देतात, याचं अतिशय मार्मिक वर्णन केलं आहे.” असं या परिच्छेदात नमूद करण्यात आलं आहे.

हे पुस्तक इंग्रजी माध्यमासाठी लिहिण्यात आलं असून हा परिच्छेद कवी कालिदास यांच्या ‘रघुवंश’ या महाकाव्याबद्दल आहे. सुदैवाने ही गडबड फक्त इंग्रजी पुस्तकात झाली असून गुजराती पाठ्यपुस्तकात अशी कोणतीही चूक झालेली नाही. गुजरात बोर्डाच्या पाठ्यपुस्तक विभागाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. नितीन पेठानी यांनी ही चूक झाल्याचं कबूल केलं असून ही अनुवादकाची चूक असल्याचं म्हटलं आहे. अर्थात पाठ्यपुस्तकांमध्ये असे अजब शोध लागण्याची ही काही पहिली वेळ नसून यापूर्वी तामीळनाडू, दिल्ली विद्यापीठ, राजस्थान इथल्या शैक्षणिक संस्थांमध्येही असे भन्नाट शोध लागले आहेत.