राम माधव यांनी भाजप सरकारच्या अपयशांचा पाढा वाचला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून होत असलेलं शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि दहशतवाद्यांचे जवानांवर होणारे हल्ले थांबवण्यास सपशेल अपयशी ठरल्यानंतर भाजपवर जोरदार टीका होत होती. अशा कोंडीनंतर भाजपनं पीडीपीला दिलेला पाठिंबा मागे घेत असल्याची घोषणा केली. मात्र ही घोषणा करताना भाजपचे नेते राम माधव यांनी आपल्याच सरकारवर हल्लाबोल केला, ज्या सरकारमध्ये ते तीन वर्षांपासून होते.

राम माधव म्हणाले की, तीन वर्षांपूर्वीचा जनादेश बघता आणि तेव्हाची स्थिती बघता पीडीपीसोबत युती केली. मात्र त्यानंतर परिस्थिती अशी बनत गेली की त्यामुळे युती टिकवणं अधिक कठीण होत गेलं. राज्य सरकार जनतेला दिलेली वचनं पूर्ण करण्यात असफल राहिल्याने आता सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत.

राम माधव यांनी सांगितल्या त्यांच्या सरकारच्या कमतरता:-

# कश्मीरमध्ये दहशतवाद वाढला

# फुटीरतावादी लोकांची ताकद वाढली, कारवाया ही वाढल्या

# राज्यात विकासाची कामं थांबली

# जम्मू आणि लडाखमध्ये विकास कामं पूर्णत: ठप्प झाली

# राज्यात मूलभूत अधिकार ‘फ्रीडम ऑफ स्पीच’ देखील धोक्यात आले

# भाजप राज्य सरकारचा एक भाग होती, पण खरी सत्ता ही पीडीपीच्या हातात होती, अंतिम फैसला त्यांचाच असायचा असं म्हणत पळ काढला

दरम्यान, कश्मीरमधील स्थितीमुळे लोकसभेच्या निवडणुकांना सामोरे जाताना देखील फटका बसण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी वर्तवली होती. त्यामुळेच भाजपने राजकीय निर्णय घेत सरकारमधून बाहेर पडल्याचे जाहीर केले, असे म्हटले जात आहे.