आजपासून….पुढचं स्टेशन ‘राम मंदीर’

7

सामना ऑनलाईन। मुंबई

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकर करत असलेली मागणी आज अखेर पूर्ण होणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर बांधण्यात आलेल्या ओशिवराजवळच्या नवीन स्टेशनला ‘राम मंदीर’ असे नाव देण्यात येणार आहे. शिवसेनेने यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता.

पश्चिम रेल्वे मार्गावरचं हे चर्चगेट आणि हडाणू दरम्यानचं ३७ वं स्टेशन असणार आहे. या स्टेशनवर अप आणि डाऊन दिशेकडील धीम्या गाड्या थांबणार आहे. फास्ट लोकल मात्र या स्टेशनवर थांबणार नाहीयेत. डाऊन दिशेने निघणारी गाडी चर्चगेटहून संध्याकाळी ५ वाजून ११ मिनिटांनी सुटेल जी संध्याकाळी ६ वाजता राम मंदीर स्टेशनला पोहोचेल. अप दिशेने निघणारी लोकल बोरिवलीहून संध्याकाळी ५.५७ ला निघेल आणि या नव्या स्टेशनला ६ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. या स्टेशनमुळे गोरेगांव आणि जोगेश्वरीतील रहिवाशांचा प्रवास आणखी सुखकर होईल अशी अपेक्षा आहे.

या स्टेशनसाठी शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी पाठपुरावा केला होता. हा पाठपुरावा कसा केला याचा त्यांनी एक व्हिडीओ ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे.

या स्टेशनच्या उद्घाटन सोहळ्याला भाजपा नेते आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांनीही या स्टेशनसाठी पाठपुरावा केला होता. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमध्ये आहेत, आणि राज्यपाल म्हणून त्यांच्या दौऱ्यासाठी नाईक यांना तिथे थांबणं गरजेचं आहे, त्यामुळे आपण या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही असं त्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.