रामदास स्वामींच्या पादुकांचे शुक्रवारी संभाजीनगरात आगमन

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा या उदात्त हेतूने श्रीक्षेत्र सज्जनगड (जि. सातारा, समाधीस्थळ) येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचे शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी संभाजीनगर शहरात आगमन होत आहे. याच दिवशी सायंकाळी ५ वाजता या पादुकांची सावरकर चौक ते श्री समर्थ राम मंदिर, समर्थनगर येथपर्यंत स्वागत मिरवणूक काढण्यात येणार आहे.

त्यानंतर तब्बल अकरा दिवस समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचे दर्शन समर्थनगर येथील समर्थ राम मंदिरात सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत खुले असेल. हा प्रचार दौरा व भिक्षा मिरवणूक समर्थ रामदास स्वामी सज्जनगडचे अध्यक्ष स्वामी भूषण यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर त्रिंबक तुपे व आमदार अतुल सावे यांची उपस्थिती असेल. या दौऱ्यादरम्यान श्रीसमर्थ पादुकांसमोर काकड आरती, सूर्यनमस्कार, श्री समर्थ पादुका पूजन, भजन, कीर्तन, प्रवचन, सज्जनगडावरील सांप्रदायिक उपासना व शेजारती असे कार्यक्रम होणार आहेत. दररोज सकाळी ८ ते १२ या वेळेत शहराच्या विविध भागात भिक्षेचा कार्यक्रम होईल. समर्थ पादुकांचे सामुदायिक पादुका पूजन व वैयक्तिक पादुकापूजनही होणार आहे.

या दौऱ्यात भिक्षाफेरी ही खालील तारखांना खालील क्षेत्रात होईल. ३० डिसेंबर रोजी समर्थनगर, नागेश्वरवाडी, खडकेश्वर, ३१ डिसेंबर रोजी उल्कानगरी, शास्त्रीनगर, जवाहर कॉलनी, तिरुपती विहार, १ जानेवारी रोजी रोकडा हनुमान कॉलनी, विश्वभारती, टिळकनगर, तापडियानगर, सहकारनगर, २ जानेवारी रोजी मायानगर, महाजन कॉलनी, एन-३/४ सिडको, ठाकरेनगर, ३ रोजी प्रल्हाद महाराज मंदिर, सातारा परिसर, ४ रोजी एन-५/६/७/८ सिडको, ५ रोजी रेणुकामाता मंदिर, पवननगर, सुरेवाडी, जाधववाडी, हडको, ६ रोजी एन-१/५/६ सिडको, आविष्कार कॉलनी, ७ रोजी गजानननगर, सारंग सोसायटी, विजय कॉलनी, पुंडलिकनगर, ८ रोजी देशपांडेपुरम, मयूरबन, देशमुखनगर, शिवाजीनगर, राजनगर, शांतीनाथ हौ. सोसायटी असा भिक्षाफेरीचा मार्ग असणार आहे. या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन समर्थवंशज भूषण स्वामी, श्रीकृष्ण चिंचोरकर, सुषमा धांडे, अनंत भागवत, रामदास तुपे, शाम देशमुख, माया देशमुख व समर्थ रामदास स्वामी संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.