लेख : हिंदुस्थानचे भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ramdas-athavale>> रामदास आठवले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातीधर्माच्या महिलांना, बहुजनांना न्याय मिळवून दिला. कामगारांना साप्ताहिक सुट्टीपासून अनेक अधिकार मिळवून दिले. कोकणातील खोती पद्धत नष्ट करून तेथील भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला. संविधानातून सामाजिक न्याय, समता, विश्वबंधुत्व; राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्मसमभाव ही मूल्ये त्यांनी देशात रुजविली. गरीबश्रीमंत उच्चनीच हे भेदभाव संविधानामुळे मिटविणारी लोकशाही देशात नांदत आहे.

हिंदुस्थानी राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन प्रचंड संघर्षावर आधारलेले आहे. त्यांनी हजारो वर्षांच्या व्यवस्थेशी संगर केला. त्यांनी उभारलेला समतेचा लढा मानवमुक्तीचा लढा म्हणून जगभर आदर्श ठरला आहे. जगभरातील समतेच्या, मानवाधिकार चळवळीला प्रेरणा आंबेडकरी विचारातूनच मिळते. अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यापीठात ते शिकले. त्या विद्यापीठात त्यांचा पुतळा उभारण्यात आला असून ज्ञानाचे प्रतीक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

मनुस्मृतीवर आधारित चातुर्वर्ण आणि त्यातून हिंदू धर्मात आलेली स्पृश्य अस्पृश्यता, जातीभेद. या भेदभावाचे दाहक चटके सोसूनही  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मावर कोणताही सूड न उगविता उलट हिंदू धर्मात सुधारणा घडविण्यासाठी हिंदू कोड बिल लिहिले. हिंदू धर्मातील विषमता नष्ट करून समतेचे उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग दिला. स्वतंत्र हिंदुस्थानचे पहिले कायदा मंत्री म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल तयार केले, मात्र ते मंजूर झाले नाही म्हणून डॉ. बाबासाहेबांनी केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातीधर्माच्या महिलांना, बहुजनांना न्याय मिळवून दिला. कामगारांना साप्ताहिक सुट्टीपासून अनेक अधिकार मिळवून दिले. कोकणातील खोती पद्धत नष्ट करून तेथील भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला.

‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा त्यांचा संदेश केवळ दलितांसाठी उपयुक्त ठरला नसून प्रगती करू इच्छिणाऱ्या सर्व समाजघटकांना उपयोगी ठरला आहे. बौद्धांनी शिक्षणाच्या बळावर मागील 60 वर्षांत प्रचंड प्रगती केली. ती अन्य समाज घटकांना प्रोत्साहन देणारी ठरली आहे. त्यामुळे अन्य समाजघटकांत शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. राजर्षी शाहू महाराजांनी 1901 मध्ये कोल्हापूर संस्थानात सर्वप्रथम आरक्षणाचे तत्त्व लागू लागू केले. त्या आधी महात्मा जोतिबा फुलेंनी आरक्षणाची संकल्पना मांडली होती. तेच तत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आणले. दलित, आदिवासींना सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून संविधानिक अधिकार म्हणून त्यांनी आरक्षण मिळवून दिले. बाबासाहेबांनी केवळ दलित- आदिवासींच्या हिताचा विचार केला नाही तर देशातील प्रत्येक समाजघटकाच्या हिताचा विचार केला. त्याचे प्रतीक हिंदुस्थानी संविधान आहे. संविधानामुळेच हिंदुस्थानची वाटचाल प्रगतीकडे आहे. हिंदुस्थानची लोकशाही मजबूत उभी आहे. संविधान लागू होण्यापूर्वी मनुस्मृतीचे राज्य अनेकांच्या मनात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. विषमतेवर समतेचा विजय व्हावा यासाठी मनुस्मृती गाडून देशात संविधानाची भीमस्मृतीचे युग सुरू झाले. संविधानातून सामाजिक न्याय, समता, विश्वबंधुत्व; राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्मसमभाव ही मूल्ये त्यांनी देशात रुजविली. गरीब-श्रीमंत उच्च-नीच हे भेदभाव संविधानामुळे मिटविणारी लोकशाही देशात नांदत आहे. गरीब आणि श्रीमंत सर्वांच्या मताला एकच मूल्य ठरविणारी राजकीय समता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदुस्थानात यशस्वी करून दाखविली. त्यांना हिंदुस्थानात सामाजिक आणि आर्थिक समता स्थापन करायची होती. ते उद्दिष्ट त्यांना साध्य करायचे होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला कार्ल मार्क्सची की बौद्धांच्या विचारांची गरज आहे यावर तुलनात्मक लेखन करून जगासमोर हे सिद्ध केले आहे की जगाला कार्ल मार्क्स नाही तर बुद्धाची गरज आहे. आता मात्र आंबेडकरी समाजात अनेक मार्क्सवादी लोक कार्ल मार्क्सचे तत्त्वज्ञान शिकविण्यासाठी घुसले आहेत. पण गेली 60 वर्षे मर्क्सवाद्यांनी कितीही प्रयत्न केले तरी आंबेडकरी समाजातील भीमसैनिक आंबेडकरी तत्त्वज्ञान सोडून अन्य विचारांना भुलले नाहीत हेही सत्य आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला सर्वोच्च महत्त्व देऊन शिक्षणप्रसारासाठी द पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. मानवी जीवनात बौद्ध धम्माला सर्वोच्च महत्त्व देऊन हिंदुस्थानात बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली तसेच समाजाला शासनकर्ती जमात व्हा असा संदेश देऊन राजकारणात प्रबळ सर्वसमावेशक राजकीय पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना त्यांनी मांडली. एकजातीय संघटन म्हणून शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन बरखास्त करण्याचा आणि रिपब्लिकन पक्षाचा विचार त्यांनी मांडला होता. खुले पत्र लिहून रिपब्लिकन पक्षाची व्यापक संकल्पना त्यांनी मांडली. त्यानुसार सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र करून व्यापक प्रबळ रिपब्लिकन पक्ष उभा करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. सर्व समाजघटकांना जोडण्यासाठी आम्ही दलित सवर्ण एकजुटीचा भूमिका घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित संविधानातील हिंदुस्थान उभारण्यासाठी समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय आणि राष्ट्रीय एकात्मता या तत्त्वांचा अंगीकार करून सामाजिक ऐक्य साधत पुढे गेले पाहिजे. रिपब्लिकन गटांचे ऐक्य झाले पाहिजे. ऐक्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेतला आहे. आता गटांच्या ऐक्याबरोबरच सर्व समाजाचे ऐक्य झाले पाहिजे .त्यातूनच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक विश्व साकारता येईल.

(लेखक केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत.

शब्दांकनहेमंत रणपिसे