गद्दार रामदास कदमांच्‍या तोंडी दुस-यांच्‍या गद्दारीची भाषा हास्‍यास्‍पद आहे, गजानन कीर्तिकर यांचा टोला

दिवाळीपूर्वीच मिंधे गटामध्ये फटाके फुटायला सुरुवात झाली असून शिवसेनेसोबत गद्दारी करून मिंधे गटात गेलेले खासदार गजानन किर्तीकर व रामदास कदम यांच्यात मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून जुंपली आहे. दोन्ही नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. गजानन कीर्तिकर पक्षाशी गद्दीर करत असल्याचा संशय रामदास कदम यांनी व्यक्त केला. याला आता गजानन कीर्तिकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

‘रामदास कदम यांचा गद्दारीचा इतिहास फार मोठा आहे. 1990 साली मी जेव्‍हा मालाड विधानसभेतून निवडणुकीसाठी उभा होतो, त्‍याचवेळेला रामदास कदम खेडमधून निवडणूक लढवत होते. माझ्या मालाड विधानसभा क्षेत्रातील कांदिवलीमधील सर्व कार्यकर्ते त्‍यांनी खेडला नेले होते व मला पाडण्‍यासाठी अथक प्रयत्‍न केले’, असा गौप्यस्फोट गजानन कीर्तिकर यांनी केला.

‘खेड-भरणा नाका ते भोर-पुणे शरद पवार यांच्‍या गाडीत बसून रामदास कदम राष्‍ट्रवादीत प्रवेश करण्‍याबाबत सविस्‍तर चर्चा करीत होते, हे त्‍यांनी विसरू नये आणि खेडमधील शिवसैनिक देखील हे विसरलेले नाहीत. एवढेच कशाला कांदिवली पूर्व महानगरपालिकेच्‍या वॉर्डामधून त्‍यांचा सख्खा भाऊ सदानंद कदम शिवसेना पक्षातून निवडणूक लढत असताना, त्‍यांना निवडून आणू नका म्‍हणून सर्व कार्यकर्त्‍यांना रामदास कदम हे दमबाजी करीत होते, असेही कीर्तिकर म्हणाले.

अनंत गीते यांना देखील 2014 च्‍या लोकसभा निवडणुकीत पाडण्‍यासाठी रामदास कदम यांनी भरपूर मेहनत घेतली, परंतु कोकणातील निष्‍ठावान शिवसैनिक गीतेंच्‍या पाठीशी उभे राहिल्‍यामुळे प्रचंड मताधिक्‍याने ते विजयी झाले’, असेही ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

रामदार कदम यांचा मुलगा सिद्धेश कदम याला लोकसभा निवडणूक लढवण्‍याची इच्‍छा झाली आहे, म्‍हणून ते विविध मार्गांनी खोट्या बातम्‍या वृत्‍तपत्र व सोशल मीडियावर प्रसारित करून वातावरण गढूळ करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. त्‍यांच्‍या या दबावतंत्राला एकनाथ शिंदे थारा देणार नाहीत. त्‍यामुळेच वैफल्‍यग्रस्‍त झाल्‍यामुळे रामदास कदम आदळआपट करीत आहेत. रामदास कदम संभ्रम निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे. त्‍यांनी हे निष्‍पळ प्रयत्‍न थांबवावेत, असा इशारा गजानन कीर्तिकर यांनी दिला. तसेच आगामी लोकसभा निवडणूक लढण्‍याचा निर्धारही कीर्तिकर यांनी व्यक्त केला.

मिंधे गटात वाद, लोकसभेच्या उमेदवारीवरून गजानन किर्तीकर व रामदास कदमांमध्ये जुंपली