मामाचे गाव आदर्श करण्याचा भाच्याने केला संकल्प

3

सामना प्रतिनिधी । जामखेड

गावातील ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी पाच लाख, शाळेतील मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी एक लाख रुपये, गावातील शिवार व पाणंद रस्त्यासाठी चार लाख असे वर्षभरात स्वतः च्या खिशातून खर्च करून गाव आदर्श करण्याचा चंग एका तरूणाने बांधला. खरे तर या तरूणाचे हे स्वत:चे गाव नाही तर त्याच्या मामाचे आहे. दरवर्षी शासकीय मदतीवर अवलंबून न राहता लोकांची मने बदलण्यासाठी, वृक्षारोपण व मुलभूत सुविधांसाठी दरवर्षी पदर खर्च करण्याचे आश्वासन या तरूणाने ग्रामस्थांना दिले आहे. रमेश आजबे असे या भाच्याचे नाव आहे. तो उद्योगपती आहे.

रमेश आजबे यांच्या मामाचे गाव झिक्री आहे. आजपर्यंत पदरमोड करून त्याने गावातील अनेक समाजोपयोगी कामे मार्गी लावलेली आहेत. पुढेही शासकीय योजनांबरोबरच स्वतः पैसे खर्च करून लोककल्याणाची व मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठीची कामे करत राहण्याचा संकल्प रमेश आजबे याने केला आहे. सावळेश्वर उद्योग समूहाचा तो मालक आहे.

वर्षभराच्या नफ्यातील काही भाग समाजहितासाठी खर्च करून व लोकसहभागातून गावातील रस्ते, वीज व पाण्याची मुलभूत समस्या सोडवून शाळेचा विकास करून जिल्ह्यातील झिक्री हे गाव पाच वर्षांत एक आदर्श निर्माण करण्याचा संकल्प रमेश आजबे याने सोडला आहे.

महाराष्ट्रातील लोक झिक्री पाहावयास येतील, असा विश्वास आजबे याने व्यक्त केला आहे. हनुमान मंदिराचा स्वखर्चातून जिर्णोद्धार करून त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आजबे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना आजबे बोलत होते.

काका चव्हाण, चंद्रकांत आजबे, दादासाहेब ढवळे, भाऊसाहेब इथापे, लक्ष्मण ढेपे, अनिल यादव, अंकुश डोंगरे, सुग्रीव सांगळे, नितीन सपकाळ, दादासाहेब घोलप, सचिन खैरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, जनार्दन कसाब, ऋषिकेश सांळूके, विजय धुमाळ, घनश्याम आडाले, बाळासाहेब इथापे, दत्तात्रय साळुंके, सचिन साळुंके, घनश्याम कसाब, चंद्रकांत कसाब, योगेश इथापे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शाळेतील मुलांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पदरमोड करून कुपनलिका घेऊन व मोटार टाकून सोडविला. लवकरच शाळेसाठी सरंक्षक भिंत बांधून अंगणवाडी व शाळा परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. गावाच्या विकासासाठी गाव दत्तक घेऊन सर्वागीण विकासासाठी प्रयत्न केला आहे. पाणंद रस्ते, शिव रस्ते, वाडीवस्तीवर वीजेची सोय, पिण्याच्या पाण्यासाठी काझेवाडी तलावातून पाईपलाईन करूण गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला जाईल. हे सर्व लोकसहभागातून व मी पदरमोड करून करणार आहे. तसेच गावातील वाद गावातच मिटवले जातील यासाठी लोकांचे मनपरिवर्तन केले जाईल. रस्त्याच्या कडेने व गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाईल. पाच वर्षांत एक आदर्श गाव निर्माण केले जाईल, असे आजबे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब इथापे यांनी केले.