शब्द, सुरांचा दैवी चमत्कार!

 रमेश देव

शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांचा एकत्रित कलाविष्कार असलेले गीतरामायण म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संचित. गेली कित्येक दशके अखंड महाराष्ट्रावर गीतरामायणचे गारुड आहे. त्यातील अलौकिक प्रतिभेच्या गीतांनी मराठी मनाच्या भावविश्वाचा मोठा भाग व्यापला आहे, पिढय़ा घडवल्या आहेत. या कलाकृतीबद्दल कृतज्ञता हा एकच भाव उरतो. त्या भावनेतूनच आमचे रमेश देव प्रॉडक्शन प्रा. लि. आणि सुबक यांनी एकत्रपणे ‘नृत्यसजीव गीतरामायण’ची निर्मिती करण्याचे निश्चित केले. गीतरामायणाच्या निर्मिती प्रक्रियेच्या काही क्षणांचा मी साक्षीदार होतो. चित्रपटसृष्टीत असल्यामुळे दोघांशी माझे घनिष्ठ संबंध होते पण गीतरामायणामुळे दोघांवर श्रद्धा जडली. दोघेही म्हणायचे हे आम्ही करत नाहीत, कुणीतरी आमच्याकडून करवून घेतंय. तो परमेश्वर हे करवून घेतोय. त्यांचे  म्हणणे खरे होते. पुन्हा तसा कलाविष्कार होणे नाही.

बाबूजींच्या प्रतिभेबद्दल मी काय बोलावं!  रेडिओवर कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग सुरू होण्याआधी अर्धा तास आधी अण्णा कागदावर गीत लिहून बाबूजींना द्यायचे. बाबूजी झटकन चाल लावायचे आणि काळजाला भिडणारे संगीत कानांवर पडायचे. गीतरामायणाच्या गीतांना डोळ्यांसमोर संगीत साज चढताना दिसायचा. चाली होत राहायच्या आणि मी ऐकत राहायचो.

गदिमांना आम्ही अण्णा म्हणायचो. मी त्यांच्यासोबत रेल्वेने प्रवास करायचो. प्रवासात अण्णा गाणं लिहित बसायाचे. त्यावेळी सतत कुणी ना कुणी यायचे. ‘अण्णा नमस्कार! अण्णा कसे आहात, तुमचं गीतरामायण ऐकतो…’ असं सतत बोलून त्यांच्या लेखनात व्यत्यय आणायचे. अण्णांना त्रास व्हायचा नाही. त्यांचे गाणे लिहून पूर्ण व्हायचे. असे हे सिद्धहस्त कवी. ‘कुश-लव रामायण गाती’, ‘माता न तू वैरिणी’, ‘पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा…’ कितीतरी गाणी आणि ते दिवस आठवत आहेत. नव्या पिढीला गीतरामायण ठाऊक नाही. ते त्यांच्यापर्यंत पोहचवण्यात आम्हीच कुठे कमी पडलोय का ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नृत्याविष्कारातून साकारलेले गीतरामायण नव्या पिढीपर्यंत पोहचायचा प्रयत्न केलाय. तुमच्या सदिच्छांची गरज आहे.