रमेश देवाडीकर

1

डोंबिवलीला अखिल भारतीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्याचा मान दोन वेळा मिळाला. त्याचे कारण या खेळाचे खंदे पाठीराखे असलेले रमेश देवाडीकर हेच होते. कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या निधनानंतर संघटनेचे प्रभारी सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले. डोंबिवलीत कबड्डीचा आलेख वरच्या दिशेने झेपावला त्याचे सर्व श्रेय रमेश देवाडीकर यांना द्यावे लागेल. डोंबिवलीत १९८८ व १९९१ मध्ये अशा दोन वेळा अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या व त्या यशस्वी करण्याचे काम पडद्याआड राहून देवाडीकर यांनी केले. संपूर्ण आयुष्य त्यांनी कबड्डीसाठी वेचले व कबड्डी हाच संसार समजून विवाहदेखील केला नव्हता. कुशल प्रशिक्षक, कबड्डी नियमांची काटेकोर माहिती, जबाबदार कार्यकर्ते व स्वभावाने विनम्र असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. शाळा-महाविद्यालयांतील स्पर्धांचे आयोजन ते करत. त्यामुळे या शैक्षणिक संस्थांचा आधारस्तंभ गेला आहे. डोंबिवलीत त्यांनी छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाची स्थापना केली व त्यामार्फत राष्ट्रीय व राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू तयार करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी कोणतीही प्रसिद्धी न घेता केले. त्यामुळे डोंबिवलीच्या कबड्डीच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कोणत्याही पदावर असले तरी मैदान तयार करण्यापासून समारंभाच्या आयोजनापर्यंत पडेल ते काम ते मनापासून करत. मैदानावर राहून दिवसरात्र कष्ट करणाऱ्या रमेश देवाडीकर यांनी कोणत्याही पुरस्कारासाठी धडपड केली नाही की अपेक्षा केली नाही. डोंबिवलीतील क्रीडा व सांस्कृतिक चळवळीतील जुने अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि कबड्डीचा खंदा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे.