रमेश पोवार हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाच्या प्रभारी प्रशिक्षकपदी

सामना ऑनलाईन | मुंबई

क्रिकेटपटूंमधील बंडाळीनंतर तुषार आरोटे यांनी अचानक हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद सोडले होते. आरोटे यांच्या जागी आता बीसीसीआयने मुंबईचा रणजीपटू आणि टीम इंडियाचा माजी ऑफस्पिनर रमेश पोवार याची प्रभारी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोवार  २५ जुलैला बंगळुरू येथे सुरु होणाऱ्या हिंदुस्थानी महिला संघाच्या सराव शिबिरात आपल्या पदाची सूत्रे स्वीकारेल.

गेल्या आठवड्यात मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत पोवार मागे पडला होता. मुंबई क्रिकेट संघटनेने मुंबईच्या प्रशिक्षकपदी माजी रणजीपटू विनायक सामंत याची नियुक्ती केली होती. पण आता बीसीसीआयने टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा निर्धार रमेश पोवार याने व्यक्त केला आहे. ४० वर्षीय पोवारने २ कसोटींत ६ तर ३१ आंतरराष्ट्रीय लढतींत ३४ विकेट मिळवल्या आहेत. त्याने १४८ प्रथमश्रेणी सामन्यांत ४७० विकेट्स मिळवल्या आहेत.