सोसायटीचे दप्तर गायब, शेतकरी कर्जमाफी पासुन वंचित, ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

सामना प्रतिनिधी, मालवण

मालवण तालुक्यातील आचरे येथील रामेश्वर विकास सेवा सहकारी सोसायटीच्या तत्कालीन सचिवाने दोन वर्षांपूर्वी संस्थेचे दप्तर गायब केले. त्यामुळे आचरे येथील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहीले. आचरा पोलिसांकडे सबळ पुरावे सादर करूनही तत्कालीन सचिव जितेंद्र पांगे यांच्यावर कारवाई न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांसह संस्थेच्या संचालकांनी आचरा पोलीस ठाण्यावर धडक देत आज ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान, आरोपीवर ठोस कारवाई करण्याच्या पोलीस निरीक्षक धुमाळे यांच्या आश्वासनानंतर ठिय्या मागे घेत दोन दिवसात कारवाई न झाल्यास कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देण्याचा इशारा ग्रामस्थ व संचालकांनी आचरा पोलिसांना दिला.

यावेळी रामेश्वर सोसायटीचे चेअरमन धनंजय टेमकर, जि.प. सदस्य जेरॉन फर्नांडिस, माजी सरपंच मंगेश टेमकर, सुरेश ठाकूर, शेखर मोर्वेकर, पं. स. सदस्य निधी मुणगेकर, संतोष कोदे, मनोहर वाडेकर, मनोहर कांबळी, वायंगणकर, भाऊ घाडी, लक्ष्मण आचरेकर, सुहास परब, तात्या भिसळे आदी शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन वर्षांपूर्वी आचरा रामेश्वर विकास सेवा सोसायटीचे तत्कालीन सचिव जितेंद्र पांगे याने संस्थेचे दप्तर गायब केल्यानंतर आचरा सोसायटीच्या चेअरमन व संचालक मंडळाने आचरा पोलिसांकडे पुरावे सादर करत पांगे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली. मात्र पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. दप्तर गायब असल्याने कर्जदार शेतकऱ्यांचा रेकॉर्ड सापडत नाही. सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर या संस्थेचे थकबाकीदार शेतकरी अडचणीत आले आहेत. तहसिल आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांच्याकडे सोसायटी थकबाकीचा रेकॉर्ड मागितला जात आहे. मात्र संस्थेचे दप्तर गायब असल्याने थकबाकीचा तपशिल संस्था देऊ शकत नसल्याने शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले आहेत.

संस्थेचा तत्कालीन सचिव जितेंद्र पांगे याच्यावर कारवाई झाल्यास भ्रष्ट कारभाराची पोलखोल होईल व सामान्य शेतकऱ्यांचे पैसे कोणी खाल्ले ते बाहेर येईल. एके काळी मालवण तालुक्यात अग्रेसर असणारी ही सोसायटी रसातळाला नेणारा कोण हे उघड होईल. या सचिवाच्या मागे असलेला भ्रष्टाचारी खरा सूत्रधार कोण हेही समोर येईल. त्यामुळे आपण राजकीय दबावाखाली येऊन काम करू नका असे ग्रामस्थांनी आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धुमाळे यांना सुनावले. यावेळी शेतकरी सभासदांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस निरीक्षक धुमाळे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. तसेच कारवाईस विलंब का होतोय असा सवाल करत त्याचे ठोस कारण देण्यास सांगितले.

कर्जदार शेतकऱ्यांची बाजू मांडताना आचरा येथील उद्योजक शेखर मोर्वेकर म्हणाले की, आज प्रामाणिकपणे सोसायटीचे कर्ज शेतकऱ्यांनी भरली तर काहींनी कर्ज थकीत राहू नये म्हणून पतसंस्थेचे कर्ज घेऊन सोसायटीची कर्जे भरली आहेत. आज या सोसायटीची कागदपत्रे सचिवाने गायब केल्याने कागदपत्राअभावी मिळणाऱ्या कर्जमाफीतून शेतकरी वंचित राहत आहेत. शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सोसायटी व पतसंस्थेची कर्जे त्यांच्या डोक्यावर आहेत. आज जर या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या ४५० शेतकऱ्यांच्या रोषाला पोलिसच जबाबदार राहतील असा इशारा मोर्वेकर यांनी दिला.

यावेळी आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी आपण यावर योग्य ती कारवाई करू असे आश्वासित करत होते. यावर आंदोलकांनी नुसते आश्वासन नको तर दोन दिवसात ठोस कारवाई करण्याच्या लेखी आश्वासनावर ठाम राहिले. त्यावर धुमाळे यांनी पांगे यांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारीनुसार कोणत्या कलमान्वये गुन्हा होतो याचे वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेऊन कारवाई केली जाईल असे लेखी आश्वासन दिल्यावर आपला ठिय्या शेतकऱ्यांनी मागे घेतला.