गोडसे-प्रज्ञा ठाकूर यांच्यावरून आझम खान यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

24

सामना ऑनलाईन। रामपूर

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आजम खान पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मदशांमध्ये गोडसे आणि प्रज्ञा ठाकूर यांच्यासारख्या व्यक्ती तयार होत नाहीत, अशी टिप्पणी करत त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

मदरशांना शिक्षणाच्या मुख्य स्त्रोतात आणण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखली आहे. त्यासंदर्भात आजम खान यांना विचारले असता त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. तसेच ते म्हणाले की, ‘लोकशाहीचे शत्रू असलेल्या नथूराम यांच्या विचारांना प्रसिद्धी देण्यात येत आहे. ज्यांच्यावर दहशतवादी कारवायांचा आरोप आहे. अशांचा गौरव कधीही केला जाणार नाही. जर केंद्र सरकार मदरशांना खरचं मदत करू पाहत आहे तर त्यात त्यांना काही सुधारणा कराव्या लागणार आहेत. मदशांमध्ये गोडसे आणि प्रज्ञा ठाकूर यांच्यासारख्या व्यक्ती तयार होत नाहीत. तर मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण दिले जाते. येथे इंग्रजी, हिंदी आणि गणितही शिकवले जाते. जे आधीपासूनच सुरू आहे. यामुळे जर तुम्हांला मदत करायचीच आहे तर ती त्यांच्या दर्जामध्ये करावी. मदरशांसाठी इमारती उभाराव्यात, फर्निचर द्यावे, माध्यान्ह भोजनाची तरतूद करावी’, असेही खान यांनी म्हटले आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर सध्या जामीनावर आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार असलेल्या साध्वी प्रज्ञा भोपाळ मतदारसंघातून निवडूनही आल्या आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांचा त्यांनी पराभव केला आहे. यादरम्यान त्यांनी महात्मा गांधी यांची 1948 साली हत्या करणारे नथूराम गोडसे हे देशभक्त असल्याचे विधान केले होते. त्यावरून मोठा वादही झाला होता. यावरूनच खान यांनी मोदी सरकारवर टीका करत हे विधान केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या