रंग रेषाकार!

>> ज्योत्स्ना गाडगीळ

शाळेत असताना सुंदर हस्ताक्षर असलेले, सुंदर चित्रकला असलेले विद्यार्थी नेहेमीच भाव खाऊन जायचे. सर्व मुलांच्या आवडीचा असलेला मोठा कॅनव्हास अर्थात `फळा’ सुशोभित करण्यासाठीही त्यांची वर्णी लागत असे. हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा कलात्मक स्पर्धांमध्ये `ते’ विद्यार्थी हमखास बक्षीस पटकावत असत. आणि त्यांच्या ह्या हटके शैलीमुळे ते शिक्षकांच्या कायम स्मरणात राहत असत. ही सगळी उजळणी करण्याचे कारण म्हणजे, ह्याच कलागुणांमुळे शाळा, महाविद्यालय आणि आता संपूर्ण कलाक्षेत्रात लोकप्रिय झालेला रांगोळी कलाकार-उमेश पांचाळ!

अवघ्या तिशीतला हा कलाकार सध्या `संस्कार भारती रांगोळी फेम’ म्हणून लौकिक मिळवत आहे. तो संस्कार भारती उपक्रमाचा कार्यकर्ता असून `ठाणे शहर रांगोळी प्रमुख’ म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. त्याने काढलेल्या रांगोळ्या केवळ शोभायात्रेचा मार्ग सुशोभित करत नाहीत, तर कोणत्याही सण-समारंभात भूअलंकरणाचे काम करतात. ज्या वसुंधरेकडे आपण कृतज्ञ होऊन बघतही नाही, त्या वसुंधरेला आपल्या रांगोळीने साज चढवण्याचे कार्य हा कलावंत अनेक वर्षांसून करत आहे. म्हणजे ह्याच्या कारकिर्दीला सुरुवात नक्की झाली कधी? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? त्यासाठी थोडे फ्लॅशबॅकमध्ये जावे लागेल.

आई आणि आजी ह्या दोन रांगोळी आर्टिस्ट छोट्या उमेशच्या पहिल्या-वहिल्या आदर्श होत्या. त्यांनी कधी गालिचा रांगोळी काढली नाही, पण दारात काढलेली सुबक-सुंदर रांगोळी बालवयातील उमेशचे लक्ष वेधून घेत असे. आई आणि आजीने त्याला घरातला एक कोपरा रांगोळीसाठी आखून दिला होता. त्या चौकोनात उमेशची रांगोळी आकार घेऊ लागली. निवडक रंगांमध्ये त्या दोघी करत असलेली रंगसंगती उमेशच्या आयुष्यात रंग भरत होती. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे उमेशची रांगोळी बहरू लागली. रांगोळीत बोटे बुडवता बुडवता भविष्यात उमेश पूर्णपणे रांगोळीत बुडाला.

उमेशच्या घरात सगळेच कलाप्रेमी आहेत, फक्त नोकरीमुळे त्यांना आपल्या कलेकडे व्यवसाय म्हणून बघता आले नाही, मात्र त्यांनी उमेशला नेहेमी पाठिंबा दिला. शालेय, महाविद्यालयीन शिक्षक, मित्रपरिवार ह्यांचेही त्याला वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले. सुंदर हस्ताक्षर असल्यामुळे उमेश शालेय वयापासून फळे रंगवण्याचे काम करत असे. आजवर त्याने हजाराहून अधिक फलक सुशोभित केले. ह्या कामातून त्याचे अक्षरप्रेम वाढत गेले. अक्षराला सुयोग्य वळण लावण्यासाठी तो डोंबिवलीतील सुलेखनकार राम कस्तुरे ह्यांच्याकडे शिकवणीला जाऊ लागला. त्याचवेळी शाळेत आयोजित केलेल्या संस्कार भारतीच्या रांगोळी शिबिरात त्याने भाग घेतला. बालपणापासून रांगोळीशी स्नेह जुळल्याने त्याने बघता क्षणी गालिचा रांगोळीची चिन्हे आत्मसात केली आणि छान सादरीकरण केले. त्यावेळी तो जेमतेम १३-१४ वर्षांचा होता. त्या शिबिरात ४० बायका आणि हा एकटाच मुलगा होता. उमेशने यशस्वीरीत्या शिबीर पूर्ण केले. त्याच्या रांगोळीची दखल घेण्यात आली आणि त्याला संस्कार भारती उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले. तिथून खऱ्या अर्थाने उमेशच्या रांगोळीचा प्रवास सुरू झाला.

काही दिवसांतच संस्कार भारतीतर्फे नागपूर येथे आयोजित केलेल्या `अखिल भारतीय रांगोळी संमेलना’त महारांगोळी काढण्यासाठी मुंबईतून चार कलाकार संमेलनास गेले होते. त्यात उमेशचाही समावेश होता. आजवर दारात पाहिलेल्या रांगोळीचे वैश्विक स्वरूप त्याला संमेलनात बघता आले. तिथे अनेक कलावंतांचे सादरीकरण त्याला पाहता आले. शैली बघता आली. तिथेच रांगोळी समितीचे अध्यक्ष रघुराज देशपांडे (भैय्याजी) ह्यांच्याशी त्याचा परिचय झाला. त्यांनी उमेशला रांगोळीची व्यापकता दाखवली. त्या अनुभवाने उमेश मोहरून गेला आणि तिथून परतल्यावर गालिचा रांगोळीचा जोमाने सराव करू लागला. डोंबिवलीतील सराव वर्गात त्याची विनायक वाघ ह्या आणखी एका रांगोळी कलाकाराशी गाठ पडली. तो सराव करत असताना उमेश एकलव्याप्रमाणे त्याच्या हाताचे निरीक्षण करत असे. गालिच्या रांगोळीतील सर्वात कठीण समजली जाणारी, पाच बोटांनी काढली जाणारी सर्परेषा उमेशने विनायक दादाकडून शिकून घेतली. आता त्या सर्परेषेतही त्याने आपली स्वतंत्र शैली विकसित केली आहे. मात्र त्याचे श्रेय नम्रपणे तो विनायक वाघ ह्यांना देतो आणि तेदेखील स्वत: उत्तम रांगोळी कलाकार असूनही गालिचा रांगोळीबाबत उमेशचे नाव सुचवतात.

`सरळ रेषा, सरळ स्वभाव’ हे वाक्य उमेशच्या रांगोळी शिबिरात हमखास ऐकायला मिळते आणि ती रेषा काढणाऱ्याला आपल्या स्वभावाची तात्काळ प्रचिती येते. पण उमेशने रेष, बिंदू, चक्र, शंख, पद्म, स्वस्तिक, सर्परेषा, अर्धवर्तुळ, पूर्णवर्तुळ, केंद्रवर्धिनी, शृंखला इ. चिन्हांचा सतरा वर्षांपासून सातत्याने रियाज केला आहे. गालिचा रांगोळीत तो ह्याच चिन्हांचा वापर करतो आणि इतरांनी करावा असा आग्रह धरतो. त्यात मेहेंदी डिझाईनचा समावेश करू नका, असेही नम्रपणे सुचवतो. त्याच्या हातून पडणारी रांगोळी पेनमधून बाहेर पडणाऱ्या शाईसारखी सहज सुटते.

त्याचे अक्षर वळणदार असल्यामुळे रांगोळीत सुलेखन हा प्रयोग त्याने रूढ केला आहे. कॉम्प्युटरचा फॉन्ट वाटावा, असे छापील टपोरे अक्षर त्याच्या रांगोळीला उठाव देतात. शब्दांचा भाव खुलवण्याची कला त्याने सुलेखनकार अच्युत पालव ह्यांच्याकडून आत्मसात केली. उदा. वीरप्पन शब्द लिहायचा असल्यास त्या शब्दातील क्रौर्य, लता शब्द लिहायचा असल्यास त्या शब्दातील नाजूकता कशी दर्शवावी ह्याची दृष्टी उमेशला पालव सरांकडून मिळाली. त्यातही प्रयोगशील राहिल्यामुळे सुलेखन त्याचा प्रांत नसूनही त्याने कॅलिग्राफीत आपल्या अनुभवातून आणि सरावातून मास्टरी मिळवली.

umesh-panchal-artist

रांगोळी आणि सुलेखन ह्यात प्राविण्य मिळवल्यावर उमेशने कलाक्षेत्रात प्रशिक्षण घेण्याचे ठरवले. सुरुवातीला त्याने डोंबिवलीच्या करंदीकर विद्यालयात शिक्षण घेतले. परंतु कलाप्रांतात मुक्तपणे मुशाफिरी करण्यासाठी त्याने मोठ्या समुद्रात उडी घेण्याचे ठरवले आणि वांद्रे येथील एल. एस. रहेजा महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेही त्याला रांगोळी आणि सुलेखन कलेने लोकप्रियता मिळवून दिली.

उमेशला नृत्याची आवड असल्याने तो महाविद्यालयातील स्नेहसंमेलनात लोकनृत्य सादर करत असे. एकदा अशाच एका कार्यक्रमात नृत्य अलंकार वृषाली शशांक दाबके ह्यांचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या नृत्याने उमेशवर एवढी मोहिनी घातली, की त्याने कथ्थक शिकण्याचा ध्यास घेतला. वृषाली ताईकडे शिकवणी सुरू करण्याचे ठरवून टाकले. दोघे-चौघे सोबत येतो म्हटल्यावर उमेशने आपलेही नाव नोंदवले. मात्र, इतरांनी शिकवणी सुरू होण्याआधीच माघार घेतली. पण उमेशने पुढे टाकलेले पाऊल मागे घ्यायचे नाही, असे ठरवून शिकण्यास सुरुवात केली. मुख्य म्हणजे त्याच्या ह्या निर्णयाचेही त्याच्या घरात स्वागत झाले.

कथ्थक नृत्यात आज स्त्रियांची संख्या जास्त असली, तरी कधीकाळी तो पुरुषांचा नृत्यप्रकार म्हणून ओळखला जात असे. पुढे पुढे पुरुषांचे प्रमाण कमी होऊन स्त्रियांची संख्या वाढली आणि आता तर हा नृत्यप्रकार केवळ स्त्रियांनी शिकावा असे समीकरण होऊन बसले. नृत्य शिकल्यामुळे मुलांमध्ये बदल होतात, असा लोकांचा गैरसमज आहे. याउलट उमेश अतिशय उत्कृट पद्धतीने पुरुषी कथ्थक सादर करतो, असे त्याचे गुरु अभिमानाने सांगतात. वृषाली ताईंच्या गुरु मंजिरी देव, त्यांचे सुपुत्र प्रसिद्ध तबलावादक मुकुंदराज देव ह्यांनीदेखील उमेशचे कौतुक केले आहे. एवढेच काय, तर त्याच्या मित्रपरिवारालाही उमेशच्या नृत्याबद्दल अतिशय आदर आहे. उमेश सांगतो, `नृत्यकला ही अनेक ललित कलांपैकी एक आहे. त्यात मला करिअर करायचे नसले, तरी ते मी मनापासून शिकतो, सराव करतो आणि कार्यक्रमातून सादरीकरणही करतो. नृत्य हे व्यक्त होण्याचे माध्यम आहे. नृत्याकडे बघण्याची पुरुषांची मानसिकता बदलण्याची मला संधी मिळाली आहे, असे मी समजतो. त्याचा आनंद घेतो आणि नित्यनवीन शिकण्याचा प्रयत्न करतो.’

नृत्य, रांगोळी, चित्र ह्या माध्यमातून उमेश समाजाची मानसिकता बदलू पाहत आहे. त्याने काढलेल्या पोट्र्रेट रांगोळींना भल्याभल्या कलाकारांनी दाद दिली आहे. रांगोळीच्या माध्यमातून हुबेहूब प्रतिमा साकारण्यात त्याचा हातखंडा आहे. एकदा बालगंधर्वांच्या रांगोळीत बारकाईने काम करत असताना त्यांच्या डोळ्यात काजळाची हलकीशी रेघ काढली. त्या बारकाव्याने रांगोळी बघायला आलेल्या आजीना मंत्रमुग्ध केले. त्या शब्दातून व्यक्त न होता अश्रूतून व्यक्त झाल्या आणि त्यांनी उमेशला भरभरून आशीर्वाद दिले. असे अनेक आशीर्वाद गोळा करून उमेशने थोरामोठ्यांकडून पसंतीची पावती मिळवली आहे.
चित्रकार वासुदेव कामत, उस्ताद झाकीर हुसेन, ज्येष्ठ कथ्थक डान्सर राजेंद्र गंगाणी, पं. बिरजू महाराज, सितारा देवी, किशोरीताई आमोणकर आणि आणखीनही बरेच कलाकार उमेशला त्याच्या कलेमुळे नावानिशी ओळखू लागले. एकदा कलादिग्दर्शक नितीन देसाई ह्यांच्या बालगंधर्व सेटवर रांगोळी साकारताना ते उमेशला म्हणाले, `मी शांताराम बापूंचा सेट साकारला आणि तू तुझ्या रांगोळीतून माझा सेट साकारलास!’ तर एका कार्यक्रमाच्या प्रसंगी गायक महेश काळे ह्यांनी त्यांची पोट्रेट रांगोळी पाहून कार्यक्रमात उमेशचा त्रिवार उल्लेख करून शुभेच्छा दिल्या. ह्या शुभेच्छाच कलाकाराचे `टॉनिक’ असते. पण सर्व ठिकाणी सारखे अनुभव येत नाहीत. अनेक ठिकाणी लोक सरळसोट रांगोळीवर पाय देऊन निघून जातात, दुर्लक्ष करतात, दखल घेत नाहीत. ह्या सगळ्याचा मनःस्ताप नको म्हणून रांगोळी काढल्याबरोबर उमेश तिथून निघून जाणे पसंत करतो.

`बालिकावधू’, `जुळून येती रेशिमगाठी’, `गोठ’, `चित्रकथी’ ह्या मालिकांमधून उमेशच्या रांगोळ्या झळकल्या आहेत. ह्या क्षेत्रात तो बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेला असला, तरी पोट्रेट रांगोळीच्या बाबतीत तो ज्येष्ठ रांगोळीकार गुणवंत मांजरेकर आणि अक्षय पै ह्यांना आपला आदर्श मानतो. रांगोळी ही त्याची ओळख असली, तरी उमेशला चित्रकलेत करिअर करायचे आहे. त्याचा सराव करत असताना तो इतर कलेलाही पुरेपुर न्याय देत आहे. तो सांगतो, `क्षेत्र कोणतेही असो, स्वत:ला झोवूâन देऊन काम करा. एखाद्या गोष्टीचा तुम्ही १०० वेळा सराव केलात, तर ती छान होईल. ५०० वेळा केलात की तुम्हाला ती समजेल आणि १००० वेळा केलीत की तुमच्याकडून ती साधना घडेल आणि तुमच्या कार्याला झळाळी येईल!’
आपल्या कलेप्रती निष्ठा ठेवून तिचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या उमेशला अनेक शुभेच्छा!

आपली प्रतिक्रिया द्या