परीक्षांमुळे राणी मुखर्जीच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलली

1

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी ही मुलगी अदिराच्या जन्मापासून लाईमलाईटपासून दूर गेली होती. चार वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर आता राणी ‘हिचकी’ हा चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. त्यामुळे राणीचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता राणीच्या चाहत्यांना तिच्या या चित्रपटासाठी आणखी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षांमुळे राणी मुखर्जीच्या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. आता हा चित्रपट २३ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

‘हिचकी’ या चित्रपटात राणी टॉरेट सिंड्रोंम हा आजार असलेल्या शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या आजारामुळे तिला सतत उचक्या लागत असतात. या आजारामुळे तिच्या करिअरमध्ये कशा प्रकारे अडचणी येतात, त्याचा ती कसा सामना करते ते या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट येत्या २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र याच दरम्यान देशभरात दहावी बारावीच्या परीक्षा असल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलली आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवरून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. “हिचकीच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलून २३ मार्च करण्यात आली आहे. या चित्रपटाला खासगी स्क्रिनिंग्समध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे यशराज चित्रपटाच्या मार्केटींग टीमने हा चित्रपट विद्यार्थ्यांच्या परीक्षांनंतर प्रदर्शित करण्याचा प्रस्ताव आदित्य चोप्राकडे ठेवला होता. त्याने तो मान्य केला आहे. त्यामुळे आता हा चित्रपट २३ मार्च २०१८ ला प्रदर्शित होईल, असे तरण आदर्श यांनी ट्विट केले आहे.