शिरूर तालुक्यातील दुष्काळी गावांसाठी रांजणगावचा गणपती धावला

2

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

शिरूर तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणी व चारा पुरवठा करण्यासाठी श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टने आता पुढाकार घेतला असून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ट्रस्टच्या वतीने पाण्याचे टँकर सुरु करण्यात आले आहेत. जनावरांसाठी चाराही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सध्या शिरूर तालुक्यातील अनेक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने शिरूर तालुक्यातील काही गावामध्ये शनिवार पासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे. जसा जसा उन्हाळा वाढू लागला आहे तशी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. खैरेवाडी, खैरे नगर, मिडगुलवाडी, मांदळवाडी, जीवनमळा या परिसरातील पिण्याचे पाणी पुरविले जाणाऱ्या विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली आहे. तर काही विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांसमोर आता पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पाणी टंचाईचा सामना करताना जत्रा, यात्रा कशा करायच्या? येणाऱ्या पाहुण्यांना किमान पिण्याचे पाणी तरी देता येईल का ? याची चिंता गावकारभारी व तेथील ग्रामस्थांना मंडळींना सध्या पडली आहे. प्रशासनाकडून जरी दुष्काळ निवारणा संदर्भात उपाय योजना करण्यात येत असल्या तरी त्यास श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट ने ही हात भार लावावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून व तालुका गट विकास अधिकारी संदीप जठार यांनी केली होती.

मानवतेच्या दृष्टीकोनातून देवस्थान ट्रस्टने येथील नागरिकांची पाण्याची समस्या ओळखून व पशुधन वाचवण्यासाठी जनावरांच्या चाऱ्याची समस्या विचारात घेत पुणे विभागाचे सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पिण्याच्या पाण्यासाठी खैरेवाडी, खैरे नगर, मिडगुलेवाडी, मांदळेवाडी या परिसरात पाण्याचे टँकर सुरु करण्याचा तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत तो अमलात देखील आणला आहे. याची सुरुवात आज शनिवार पासून खैरेवाडी येथून करण्यात आली. यावेळी श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष अॅड. विजयराज दरेकर, उपाध्यक्ष प्रा. नारायण पाचुंदकर, सचिव डॉ. संतोष दुंडे, अकाऊंटंट संतोष रणपिसे, लक्ष्मण गटाप,सरपंच नवनाथ खैरे, संचालक उत्तमराव खैरे,सरपंच गणेश मिडगुले यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. परिसरामध्ये तीव्र पाणी टंचाईची स्थिती पाहता नागरिकांनी पाण्याचा वापर योग्य व जपून करावा, असे आवाहन यावेळी देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले. तसेच दि. ५ मे रोजी देवस्थान ट्रस्टने आयोजित केलेल्या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आपल्या मुला मुलींचे विवाहाची नाव नोंदणी करण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.