दुसरा दिवसही बडोद्याचा

सामना ऑनलाईन । मुंबई

बडोदा क्रिकेट संघाने वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील ‘क’ गटाच्या लढतीचा दुसरा दिवसही गाजवला. पहिल्या दिवशी बलाढय़ मुंबईला १७१ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर बडोद्याने दुसऱया दिवसअखेर ४ बाद ३७६ धावा करीत २०५ धावांची सणसणीत आघाडी घेतली. अनुभवी खेळाडू आदित्य वाघमोडेच्या दमदार १३८ धावा आणि विष्णू सोलंकी, कर्णधार दीपक हुडा व स्वप्नील सिंग यांची अर्धशतके शुक्रवारच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले.

बडोद्याने १ बाद ६३ या धावसंख्येवरून सकाळच्या सत्रात पुढे खेळायला सुरुवात केली. आदित्य वाघमोडे व विष्णू सोलंकी या जोडीने दुसऱया विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली. शार्दुल ठाकूरने विष्णू सोलंकीला ५४ धावांवर बाद करीत जोडी फोडली. त्यानंतर आदित्य वाघमोडे व दीपक हुडा या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दोघांनी १४० धावांची भागीदारी रचत बडोद्याला मुंबईच्या धावसंख्येच्या पुढे नेले. विजय गोहीलने दीपक हुडाला ७५ धावांवर बाद केले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. आदित्य वाघमोडेने ३०९ चेंडूंत १ षटकार व १३ चौकारांनिशी १३८ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्याने स्वप्नील सिंगसोबत महत्त्वाची भागीदारी रचली. आदित्य वाघमोडेने या खेळीत मुंबईच्या गोलंदाजांचा समर्थपणे मुकाबला केला. अखेर पार्टटाइम गोलंदाज श्रेयस अय्यरच्या गोलंदाजीवर तो अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद झाला. स्वप्नील सिंग ६३ धावांवर खेळत असून त्याच्यासोबत अभिजित करमबेलकर ८ धावा करून खेळपट्टीवर उभा आहे. मुंबईचा कर्णधार आदित्य तरे याने या डावात सात गोलंदाजांचा वापर केला. यावेळी धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर, रॉयस्टन डियास, विजय गोहील, अभिषेक नायर, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर या सात गोलंदाजांनी सर्वस्व पणाला लावले.

रोहितच्या १८९ धावा

रोहित मोटवानीच्या १८९ धावांच्या जोरावर महाराष्ट्र क्रिकेट संघ पुण्यात सुरू असलेल्या ‘अ’ गटाच्या लढतीत भक्कम स्थितीत आहे. महाराष्ट्राच्या संघाने रेल्वेविरुद्धच्या लढतीत पहिल्या डावात ४८१ धावा केल्या असून रेल्वेने दुसऱया दिवसअखेर बिनबाद ८८ धावा केल्या आहेत. आता त्यांचा संघ ३९३ धावांनी पिछाडीवर आहे.