संस्मरणीय कामगिरी करत स्वप्नपूर्ती !

सामना ऑनलाईन । इंदोर

रणजी ही हिंदुस्थानातील मानाची स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न प्रत्येक राज्य बघत असतो. मात्र मुंबई, कर्नाटक, दिल्ली यांसारख्या बलाढय़ संघांपुढे इतरांची डाळ शिजत नाही. पण गेल्या मोसमात गुजरातने मुंबईला आणि यंदा विदर्भाने दिल्लीला धूळ चारून रणजी स्पर्धा जिंकण्याची करामत करून दाखवलीय. दोन्ही संघांनी आपली स्वप्नपूर्ती करताना संस्मरणीय कामगिरी केलीय हे विशेष.

कसून सरावाचा फायदा फैझ

विदर्भाच्या क्रिकेट संघाने या वर्षी देदीप्यमान कामगिरी केली. प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यासमवेत संपूर्ण स्टाफ व क्रिकेटपटूंनी केलेल्या अपार मेहनतीमुळेच ऐतिहासिक प्रदर्शन करता आले, असे भावुक उदगार विदर्भाचा कर्णधार फैझ फझल याने यावेळी काढले. तसेच मोसम सुरू होण्याआधी केलेल्या कसून सरावाचा फायदा झाल्याचेही त्याने पुढे नमूद केले.

पंडित, सुब्रतो यांच्या मार्गदर्शनामुळेच गुरबानी

रणजीच्या फायनलमध्ये हॅटट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज ठरणाऱया रजनीश गुरबानी याने या जेतेपदाचे श्रेय मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित व सहाय्यक प्रशिक्षक सुब्रतो बॅनर्जी यांना दिले. दोघांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळेच खेळाडूंना दिमाखदार कामगिरी करता आलीय, असे सामनावीर ठरलेल्या या खेळाडूने आवर्जून नमूद केले.