प्रशिक्षक चंद्रकांत पंडितांच्या कडक शिस्तीचा रणजी जेतेपदात सिंहाचा वाटा

1

सामना प्रतिनिधी। नागपूर

विदर्भाने सौराष्ट्रावर अंतिम फेरीत मात करुन सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. प्रशिक्षक चंद्रकांत पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या विदर्भाने स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली. कडक शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रकांत पंडीत यांनी संघाची घडी बसविण्यासाठी काही कडक नियम आखले होते. तेच नियम आणि प्रशिक्षक पंडित यांची शिस्त विदर्भाच्या जेतेपदप्राप्तीला लाभदायक ठरले अशा शब्दांत कर्णधार फैज फजलनेच विदर्भाच्या अपूर्व यशाचे रहस्य उलघडले आहे.

प्रशिक्षक पंडित यांच्या कडक शिस्तीमुळे विदर्भाच्या गोलंदाजांनी अंतिम फेरीत आपली कमाल दाखवली. आदित्य सरवटे, अक्षय वाखरे यांनी सौराष्ट्राचा डाव झटपट गुंडाळण्यासाठी मदत केली. याचसोबत चंद्रकांत पंडीत यांना संघाला शिस्त लागण्यासाठी उशीरा येणारे खेळाडू, ड्रेसकोड न पाळणाऱ्या खेळाडूंनाही दंड भरायला लावल्याचं कर्णधार फजल म्हणाला.

एका नो बॉलला ५०० तर ,नो बॉलवर विकेट घेतल्यास १ हजार रुपये दंड

आपल्या गोलंदाजांचा शिस्त लागावी यासाठी चंद्रकांत पंडीत यांनी, सामन्यात नो-बॉल टाकणाऱ्या गोलंदाजांना ५०० रुपयांचा दंड ठेवला होता. याचसोबत जो गोलंदाज सामन्यात नो-बॉलवर विकेट घेईल त्याला १ हजार रुपयांचा दंड भरावा लागायचा.पंडित यांच्या या शिस्तीनेच विदर्भाचे गोलंदाज अधिक कणखर बनले असेही फैझने स्पष्ट केले.