दगड मारून वाघाला उठवणे पडले महाग, पर्यटक आणि गाईडला 51 हजारांचा दंड

1
प्रतिकात्मक फोटो

सामना प्रतिनिधी । रणथंबोर

राजस्थानमधील रणथंबोर अभयारण्यामध्ये झोपलेल्या वाघाला दगड मारणे एका पर्यटकाला आणि गाइडला चांगलेच महागात पडले आहे. त्यांना 51 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे शिवाय त्या गाईडला अभयारण्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

रणथंबोरमध्ये मंगळवारी झोन-6 च्या पीलीघाट गेटवर पर्यटक आणि गाइड यांनी एका झोपलेल्या एका वाघाला पाहिले. त्यावेळी पर्यटक कॅमेऱ्यासह जिप्सीमध्ये बसला होता. पर्यटकाला वाघाचे छायाचित्र मिळावे म्हणून गाइडने खाली उतरून दगड मारून वाघाला उठवण्याचा प्रयत्न केला.हा सर्व प्रकार तेथे लावण्यात आलेल्या इमेजिंग कॅमेऱ्यामध्ये टिपला गेला. वाघांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तेथे तो कॅमेरा लावला होता,अशी माहिती वनाधिकाऱ्यानी दिली. वनआधिकारी मुकेश सैनी म्हणाले की, पर्यटक आणि गाइड यांनी येथील नियमांचे उल्लघंन केले आहे. या प्रकारानंतर आम्ही त्यांना अभयारण्यातून हाकलून दिले आहे. त्यासोबत त्यांना 51 हजार रूपयांचा दंड ठोठावला. तसेच त्या गाइडला अभयारण्यात बंदी घालण्यात आली आहे.