रावसाहेब दानवे यांनी थकवले अडीच लाखांचे वीजबिल

सामना ऑनलाईन । जालना

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ८३ महिन्यांचे म्हणजेच जवळपास सात वर्षांचे तब्बल दोन लाख ५९ हजार रुपयांचे वीजबिल थकवले आहे. थकीत वीजबिलापोटी दानवेंनी फुटकी कवडीही भरलेली नसताना महावितरण मात्र कोणतीही कारवाई न करता हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसले आहे. त्यामुळे सामान्य ग्राहक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे रावसाहेब दानवे यांचे घर आहे. त्यामध्ये घरगुती वीज कनेक्शन आहे. सर्वसामान्यांचे वीजबिल थकले की कनेक्शन कट करणारे महावितरणचे कर्मचारी दानवेंबाबत का गप्प आहेत, त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महावितरणच्या एकूण वीजबिल थकबाकीचा आकडा २० हजार कोटींवर आहे. त्यामध्ये बड्या राजकीय धेंडांच्या थकीत वीजबिलाचा मोठा आकडा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.