बलात्काराचा फरार आरोपी झाला खासदार

1235

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशमधल्या घोसी मतदार संघातून बसपाचा उमेदवार निवडून आला आहे. पण, या उमेदवारावर बलात्कारासारखा गंभीर आरोप आहे. अतुल राय असे या उमेदवाराचे नाव असून गेल्या काही काळापासून राय फरार आहेत. त्यामुळे राय यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांच्या जल्लोषातही राय गैरहजर असल्याचं समोर आलं आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, अतुल राय यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. एप्रिल महिन्यात एका तरुणीने पत्नीशी भेटवण्याच्या बहाण्याने राय यांनी आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला होता. तरुणीच्या तक्रारीनंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी राय यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून राय फरार होते. या आरोपांनंतर राय यांच्या बचावासाठी अनेक दिग्गज नेते पुढे आले होते. त्यात बसपा अध्यक्षा मायावती यांचाही समावेश होता. तसेच राय यांनी दाखल केलेला जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला होता.

असे असूनही राय हे घोसी मतदारसंघातून निवडून आले आहेत. या विजयामागे सपा-बसपाची जातीय समीकरणं असल्याचं बोललं जात आहे. कारण, घोसी मतदारसंघात तब्बल साडे तीन लाख जाटव आणि आणि दोन लाख यादव आहेत. तर चार लाख सवर्ण आणि अन्य जातीय लोकांचा समावेश आहे. त्यामुळे बलात्काराचे आरोप होऊनही राय निवडून येतील असं भाकित केलं गेलं होतं आणि ते खरे ठरल्याचं दिसून येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या