दिल्लीत दीड वर्षाच्या मुलीवर बलात्कार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बलात्काराच्या घटनेमुळे देशाची राजधानी दिल्ली पुन्हा हादरली आहे. दिल्लीतील अमन विहार भागात एका दीड वर्षाच्या चिमुकलीवर एका ४५ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. राकेश असे त्या नराधमाचे नाव असून त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

सदर मुलगी दिल्लीतील अमन विहार भागात तिच्या पालकांसोबत राहते. बुधवारी दुपारी ती घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या आई वडिलांनी शोधाशोध केल्यानंतर शेजारी राहणाऱ्या राकेशच्या घरातून मुलीचा आवाज आला. त्यानंतर तिच्या पालकांनी व आजूबाजूच्यांनी राकेशला दरवाजा उघडायला सांगितले. त्यावेळी त्याने मागच्या दरवाज्याने पळून जायचा प्रयत्न केला मात्र शेजाऱ्यांनी त्याला पकडले. घरात सदर मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. मुलीच्या पालकांनी तिला तातडीने संजय गांधी रूग्णालयात दाखल केले असून तेथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी राकेशला अटक केली असून त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश हा विवाहित असून त्याला दहा, सहा आणि दोन वर्षाची तीन मुले आहेत. बलात्कार केला तेव्हा राकेशची पत्नी व मुले बाहेर गेली होती व राकेश दारू पित घरात बसला होता. असे पोलिसांनी सांगितले.