रसिक हजारे

2

डोंबिवली म्हणजे साहित्य, संस्कृती, कला, संगीत, शिक्षण अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा वारसाच डोंबिवलीला मिळाला आहे. असेच संगीत क्षेत्राचे वारसदार रसिक हजारे होते. रसिक यांचे वडील शरद हजारे हे आता ९५ वर्षांचे आहेत. प्रसिद्ध दिलरुबा वादक अशी त्यांची ओळख आहे. रसिक हजारे यांची ओळख निष्णात सतारवादक अशी होती. त्यांच्या अचानक निधनाने डोंबिवलीतील सांगीतिक क्षेत्राला मोठाच धक्का बसला. ‘अखंड उत्साहाचा झरा’ हेच त्याचे वेगळेपण होते. असा हा उत्साहाचा झरा अचानक नाहीसा झाल्याने संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. पंडित रविशंकर यांचे  पट्टशिष्य शमीम अहमद खान यांचे ते शिष्य होते. मुंबई विद्यापीठ, महिला विद्यापीठात त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना सतारीचे शिक्षण दिले. हजारे यांनी मद्रास विश्व विद्यालयातून एमफीलचे शिक्षण घेतले. डोंबिवलीतील विद्यार्थ्याना सतार वादनाचे शिक्षण देण्याच्या हेतूने ‘रसिक संगीत विद्यालय’ स्थापन केले. तेथे त्यांनी कधी घडय़ाळ पाहून मुलांना शिकवले नाही. गुरुकुल पद्धतीने ते शिकवत. अनेक मोठय़ा कलाकारांना त्यांनी साथ दिली. सतारीचा रियाज करण्यासाठी ते वज्रेश्वरीसारख्या शांत ठिकाणी जात व तेथे चोवीस चोवीस तास रियाज करत. नव्या रागांची रचना ते करत. त्यांनी तयार केलेल्या नवीन रागाला गंधर्व महाविद्यालयाने मान्यता दिली होती. आलाप, जोड आणि झाला यावर पं. हजारे यांचे प्रभुत्व होते. मुंबई, महाराष्ट्रासह देश- विदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम झाले. हरिदास संगीत संमेलन, कल के कलाकार, चतुरंग प्रतिष्ठान, सदाशिव अकादमी आदी अनेक कार्यक्रमांत त्यांनी कार्यक्रम केले. रसिक हजारे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘राग – रंग – गीत बंध’ हा कार्यक्रम तर खूपच गाजला. डोंबिवलीतील सुधीर फडके स्मृती समितीचे ते तीन वर्षे विश्वस्त होते. पं. रविशंकर यांचा ‘तिलमशाम’ ते फार सुंदर वाजवत असत. असा हा कलाकार अचानक मैफलीतून उठून गेल्याने डोंबिवलीचे संगीत चळवळीचे नुकसान झाले आहे.