रस्त्यसाठी ९ गावांचा रास्ता रोको, जिल्हा परिषदेच्या उदासीन कारभारावर संताप

सामना ऑनलाईन,जालना

घनसावंगी तालुक्यातील मुरमा ते भोगगाव या १५ किलोमीटर  रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यांवर जागोजागी खड्डे निर्माण झाल्याने या रस्त्यावरून वाहन चालवणे जिकरीचे बनले आहे.  या पंधरा किमी रस्त्याचा काही भाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तर काही भाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या कार्यकक्षेत येतो. रस्त्याचा खराब झालेला बहुतांश भाग हा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा आहे. गेल्या चार वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती झाली नसल्याचे कळते.

गुरुवारी रस्ता  दुरुस्तीच्या मागणीसाठी तीर्थपुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीर्थपुरी, मुरमा, रामसगाव, शेवता, लिंगसेवाडी, बानेगाव, सौन्दलगाव, विठ्ठलनगर, भोगगाव या गावातील सर्वपक्षीय नागरिकांनी एक तास रास्तारोको आंदोलन केले. मंडळ अधिकारी एस.टी. साळवे, एपीआय अनिल परजने यांनी निवेदन स्वीकारले, यावेळी माजी सभापती तात्यासाहेब चिमणे, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख श्रीकृष्ण बोबडे, नकुल भालेकर, तुषार पवार, गणेश पघळ,  सतीश उढाण, टिल्लूपंत उढाण, सुधाकर बोबडे, भीमराव गवते, सतीश बुरांडे, भगवान आरबड हे उपस्थित होते.