परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचा रास्तारोको

1

सामना प्रतिनिधी । परभणी

अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, १ ऑक्टोबरला मानधनवाढीची घोषणा केली. परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही, या व अन्य मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जेलभरो आंदोलनाच्या पाठोपाठ आज अचानक दुपारी ३ वाजेच्या सुमारास रास्तारोको केला. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अ‍ॅड. माधुरी क्षीरसागर, सीमा देशमुख व अर्चना कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना पेन्शन योजना लागू करावी, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात मन की बात यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेबर-२०१८ मध्ये मानधन वाढीची घोषणा केली आणि १ ऑक्टोबर पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोषणा देखील केली होती. प्रत्यक्षात मात्र या घोषणांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्याच्या निषेधार्थ आयटक सलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियमनच्यावतीने शिवाजी पुतळ्याजवळ जेलभरो आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, किंवा तोपर्यंत १८ हजार रुपये वेतन द्यावे, सेवा समाप्ती लाभ, वाढती महागाई लक्षात घेता वेतानात तिप्पट वाढ द्यावी, एकूण मानधनाच्या निम्मी रक्कम पेन्शन म्हणून अदा करावी, अंगणवाडी सेविका व मदतनिसांना विमा योजना लागू करुन मे महिन्याची पगारी सुटी द्यावी, अबंरेला योजनेला त्वरीत सुधारीत दर लागू करावेत, ताजा व सकस आहार देण्यात यावा, थकीत टी.ए. व डि.ए. रक्कम अदा करण्यात यावी, या मागणीसाठी रास्तारोको करण्यात आला. या महिलांची अटक व सुटका करण्यात आली. या आंदोलनामध्ये अ‍ॅड. माधुरी क्षीरसागर, सीमा देशमुख व अर्चना कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सुनिता धनले, रत्नमाला कदम, अश्विनी वाघमारे, निर्मला राठोड, ज्योती कुलकर्णी, ताहेरा बेगम, नजमा बेगम, देशमुख, गोडबोले, भोळे व अंगणवाडी कार्यकत्र्या व सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.