व्यापार शिकल्यामुळेच शेतकऱ्यांचा फायदा, सोयाबीन दरवाढीबाबत पाशा पटेल यांची प्रतिक्रिया

193

सामना प्रतिनिधी । लातूर

सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असणारा दर, शासनाची अनुकूल होत जाणारी धोरणे याचा अंदाज घेवून राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्याना सोयाबीन विक्री न करण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन लक्षात घेत शेतकऱ्यांनी व्यापारी धोरणे अवलंबले. दरम्यानच्या काळात बाजारपेठेत सोयाबीनचा दर वाढला. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाल्याचे सांगत पाशा पटेल यांनी आपल्या शब्दावर विश्वास ठेवल्याबद्दल शेतकऱ्यांचे आभार मानले.

याबाबत माहिती देताना पाशा पटेल म्हणाले की, आज लातूर बाजारपेठेत सोयाबीनला ३८११ रुपये दर मिळाला. काल इचलकरंजीत घोडावत इंडस्ट्रीजने २९१० रुपयांनी खरेदी केली. तर कीर्ती गोल्डने १५ मार्च रोजी सोयाबीनला ४ हजार रुपये भाव देण्याची घोषणा केली आहे.

काही दिवसांपुर्वी सोयाबीन बाजारात आल्यानंतर आपण शेतकऱ्याना सोयाबीन विक्री न करता ते ठेवण्याचे आवाहन केले होते. आगामी काही दिवसात भाववाढ होणार असल्याने फायदा होऊ शकतो. यासाठी आपण हा सल्ला दिला होता. त्यावेळी सोयाबीनला २५०० ते २६०० रुपये भाव होता. शेतकऱ्यानी माझा शब्द ऐकला. सोयाबीन विक्री न करता तसेच ठेवले.

धारण आणि मरण हे कोणाच्याही हातात नसते असे म्हणतात. पण धारण काय असावे हे आपण सांगितले होते , लोकांना आणि शेतकऱ्याना त्याचा विश्वास बसला. त्यामुळेच सोयाबीन विक्री न करता तसेच ठेवले. पहिल्यांदाच रस्त्यावर न उतरता आणि कसलेही आंदोलन न करता शेतकऱ्यांना भाव वाढवून मिळाला. सोयाबीन बाजारात न्यायचेच नाही ही अनोखी रीत शेतकऱ्यांनी स्वीकारली. परिणामी आज व्यापाऱ्या ऐवजी शेतकऱ्यांकडे सोयाबीनचा साठा असल्याचे पटेल म्हणाले.

शेतकऱ्यांनी धीर धरला, तेजी मंदी केली. त्याचा फायदा झाला. सोयाबीनचा दर ४ हजार रुपयांवर जाईल, असे मी म्हणालो होतो. तो शब्द खरा ठरला. याबद्दल शेतकऱ्यांचे आभार मानले पाहिजेत असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी माझे म्हणणे ऐकून धोका पत्करला. त्यामुळे आगामी काही दिवसात ४ हजार दर मिळणार आहे. हा दर वाढावा यासाठी पेंड निर्यातीवर असणारे अनुदान २ टक्क्यावरून १० टक्के केले. आता आणखी ५ टक्के निर्यात अनुदान वाढविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नीती आयोगाकडे प्रस्ताव दाखल करण्याची सूचना केली आहे. हे झाले तर भाव आणखी 200 रुपयांनी वाढू शकतात. सोयाबीनची रास होण्यापुर्वी मुख्यमंत्री आणि चीनचे कौन्सिलर जनरल यांची भेट घालून दिली. इराण बरोबर व्यवहार सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. बांग्लादेशने सार्कच्या माध्यमातून रचलेला खाद्यतेल आयातीचा कट उधळून लावला. आपण वेळोवेळी केलेल्या सुचना पंतप्रधान नरेंद्र मोदी ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ,केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐकल्यामुळेच हे शक्य होवू शकले. यामुळेच आज दर वाढला आहे. अशी भावना पाशा पटेल यांनी व्यक्त केली.

भविष्यात शेतकऱ्यांचा एक पाय शेतात आणि दुसरा पाय बाजारात असल्याशिवाय शेती फायद्याची होणार नसल्याचेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या