नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त रथोत्सव

1

सामना प्रतिनिधी । हिंगोली

’हर हर महादेव…, ओम नम: शिवाय…, श्री नागनाथ महाराज की जय…’ अशा जयघोषामध्ये औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त रथोत्सव साजरा करण्यात आला. या रथोत्सव सोहळ्याला हजारोच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.

महाशिवरात्रीच्या निमित्त औंढ्यात चालणाऱ्या सोहळ्यामध्ये श्री नागनाथ ज्योतिर्लिंगाचा रथोत्सव हे प्रमुख आकर्षण आहे. १७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये या रथोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. रथामध्ये श्री नागनाथ ज्योतिर्लिंगाची उत्सव मुर्ती ठेवण्यात आली होती. तसेच रथाला फुलांच्या माळा आणि दिव्यांच्या माध्यमातुन सजविण्यात आले होते. श्री नागनाथ मंदिराला पाच प्रदक्षिणा मारण्यात आल्या. यावेळी भाविकांनी हर हर महादेव…, श्री नागनाथ महाराज की जय …., ओम नम: शिवाय…. असा जयघोष केला. श्री नागनाथ ज्योतिर्लिंगाची उत्सव मुर्ती आणि रथाचे दर्शन घेण्यासाठी २५ हजाराच्यावर भाविकांनी अलोट गर्दी केली होती. या रथोत्सव सोहळ्याला शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा जयाताई अनिल देशमुख, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, प्रसिध्द नेत्ररोगतज्ञ डॉ. किशन लखमावार, शिवाजी देशपांडे, सभापती भिमराव भगत, रामप्रसाद कदम, आमदार संतोष टारफे, उपनगराध्यक्षा अलका कुरवाडे, रमेशचंद्र बगडीया यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, श्री नागनाथ मंदिरातील पुजारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभाग, गृहरक्षक दल तसेच स्वयंसेवकांनी बंदोबस्त ठेवला होता.