मुरबाडचा विकास: धान्य घोटाळेबाजांची ओटी सजलेली आणि गरीबांची चुल विझलेली

गोपाळ पवार । मुरबाड

2006-7 मध्ये संपूर्ण ग्रामीण योजनेत झालेल्या कोट्यावधी रुपयाच्या धान्य घोटाळ्याची चौकशी गुलदस्त्यात असतानाच गेल्या दहा वर्षांपासून धान्य घोटाळ्याची मालिका सतत सुरु आहे. या घोटाळेबाज माफियांच्या घरांची ओटी सजलेली आणि गरीबांची चुल मात्र विझलेली असल्याचे चित्र महावयास मिळत आहे.

दिवाळीच्या सणात ग्रामीण भागातील जनतेची उपासमार होऊ नये म्हणुन पुरवठा विभागाने ऑक्टोबर महिन्यापासून प्रत्येक रेशन दुकानदाराला धान्याचा पुरवठा केला मात्र घोटाळेबाज दुकानदारांनी नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यातच दिवाळी साजरी केली. सप्टेंबर मध्येच उचलेले धान्य हे आक्टोबर मध्ये दिवाळीच्या निमित्ताने वाटले आणि दिवाळीत आलेले धान्य हे काळ्याबाजारात विकण्याचा मार्ग मोकळा केला. मात्र आक्टोबरचा शेवटचा आठवडा आणि नोव्हेंबरचा पहिला आठवडा सलग सुट्या असल्याने दि.12 नोव्हेंबर रोजी या घोटाळेबाज दुकानदारांनी मुरबाड शासकीय गोदामात रांगा लाऊन धान्याची उचल केली. सुमारे दहा ते पंधरा दुकानदारांनी गोरगरीबासाठी असलेले धान्य दुकात नेले. तर बाकीच्या दुकानदारंनी गाव परिसरातील आदिवासी, वाड्या पाड्यातील नागरिक हे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित झालेले आहेत, या संधीचा फायदा घेत मुरबाड शहरातील राईसमिल धारक व पिठाची गिरणीत काळ्या बाजाराने विकले. तर काहीनी नढई – नारिवली मार्गावरील धान्य तस्करांना धान्य विकले.

एकीकडे रोजगार नाही, रोजगार नाही म्हणून धान्य घेण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे गोरगरीब आदींवासींची उपासमार होत आहे अणि त्याच गोरगरीब जनतेसाठी असलेले धान्य काळ्याबाजारात विकले जात आहे. हा मुरबाड मधील रेशन दुकानदारांचा गोरख जोडधंदा जोरात सुरू आहे. या धंद्यात शासकीय यंत्रणा देखील सहभागी असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला संपूर्ण ग्रामीण योजनेचा कोट्यावधीचा घोटाळा हा आजपर्यंत गुलदस्त्यातच राहिला आहे. त्या घोटाळेबाज दुकानदारांची पोलखोल चार ते पाचवेळा झाली तरीही त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही. मुरबाड तालुक्यातील धान्याच्या काळाबाजाला आळा कधी व कोण घालणार, असा संतापजनक सवाल नागरिक विचारत आहेत.

ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत धान्याची उचल केलेली गावे
डेहनोली, पोटगाव, सरळगांव, चिरड, देवपे, मुरबाड नं 1,2,3,4,5,6, खांदारे, वैशाखरे, शेलारी, तळेखल, उचले, पिपंळगाव, जामघर, कोंडेसाखरे, नांदेणी, मोहरई, कुडवली, धानिवली, चिखले, वांजळे, मानिवली, शिवळे.आंबेळे बु।।केदुर्ली,रावगाव, उब्रोली बु।।, राजंणगाव. भुवन, खाटेघर, बोरगाव, भालुक.

धान्याचा काळाबाजार झाल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांकडून प्राप्त झाल्याने पुरवठा विभागाच्या पथकाकडून त्या दुकानांची पडताळणी करुन दप्तर तपासणीचे आदेश दिलेले आहेत. अहवाल प्राप्त होताच निलबंनाचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर केला जाईल. – सचिन चौधरी, तहसीलदार, मुरबाड.