नाणार प्रकरणी भाजपचा अडेलतट्टूपणा कायम

1

सामना प्रतिनिधी ।रत्नागिरी

स्थानिकांचा विरोध असतानाही नाणार प्रकरणी भाजपचा अडेलतट्टूपणा कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नाणार रिफायनरी होणारच असे भाजपचे रत्नागिरी प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. रत्नागिरीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोकणातील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी रिफायनरी होणारच असे म्हटले. लाड यांच्या या वक्तव्यावरून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना लाड यांनी भाजपने २०१९ च्या निवडणूकांची तयारी सुरू केल्याचे सांगितले. दरम्यान, यावेळी भाजप आमदार राम कदम यांच्या अश्लाघ्य वक्तव्यावर बोलताना “महिलांच्या बाबतीत कुणी वाईट बोलू नये आमदार राम कदम यांच्या वक्तव्याची चित्रफिती पक्षाची मुंबई समितीने ताब्यात घेतली आहे. त्यावर योग्य ती भूमिका मुंबई समिती घेईल. मला वाटतं की भाजपच्या कोणत्याही कार्यकत्याने महिलांच्या बाबतीत वाईट बोलू नये. असे त्यांनी सांगितले.

नाणार प्रकल्पामुळे कोकणी जनता देशोधडीला लागणार आहे. यामुळे स्थानिकांचा या प्रकल्पास विरोध आहे. शिवसेनेचाही या प्रकल्पास विरोध असून नाणारमध्ये प्रकल्प होऊ देणार नाही असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. शिवसेना कायम स्थानिकांच्या मागे असल्याचे प्रतिपादन शिवसेना आमदार राजन साळवी यांनी यासंदर्भात बोलताना ठामपणे केले आहे.