चविष्ट आहाराचा ‘विहार’ थांबला

9

सामना ऑनलाईन। रत्नागिरी

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या रत्नागिरी शहरातील विहार उपहारगृह तब्बल 68 वर्षांनंतर बंद झाले. घरगुती पदार्थांमुळे लोकप्रिय झालेल्या विहार उपहारगृहाशी अनेकांचे ऋणानुबंध जुळले होते. एसटीने येणारा गावकरी बाजारपेठेतील खरेदीनंतर विहार उपहारगृहामध्ये पोटपूजा करायचा… स्थानिक मंडळीही चमचमीत पदार्थ खाण्यासाठी सकाळ-संध्याकाळ विहार उपहारगृहामध्ये गर्दी करायचे… बाहेर गावाहून येणाऱया मंडळींसाठी रत्नागिरीमध्ये आल्यावर आपण कोठे उतराल अशी जाहिरातच त्या काळी विहार उपहारगृहाने केली होती. आज 68 वर्षांनंतर विहार उपहारगृहातील खाद्यपदार्थांच्या चमचमीत, झणझणीत आणि चवदार आठवणी पुन्हा एकदा जिभेवर रेंगाळू लागल्या आहेत.

18 मे हा विहार उपहारगृहाचा वर्धापन दिन. 1950 साली विहार उपहारगृह पटवर्धन बंधूंनी सुरू केले. गोखले नाक्यातील हे विहार उपहारगृह ऐतिहासिक ठेवा आहे. त्या काळातील एक आगळीवेगळी दुमजली इमारत ही विहार उपहारगृहाची एक शान होती. कै. गंगाधर गोविंद पटवर्धन यांनीच हे विहार आदर्श विश्रांतिगृह आणि विहार भोजनालय सुरू केले. स्वतः गंगाधर पटवर्धन दुधाच्या किटल्या घेऊन विहारमध्ये जात. अतिशय कष्टाने आणि नेटकेपणाने सांभाळलेल्या या विहार भोजनालयाने एक लोकप्रियता मिळवली. साप्ताहिकात जाहिरात देऊन व्यवसाय अधिक वृद्धिंगत करावा असा दृष्टिकोन भाऊ पटवर्धनांनी त्यावेळी ओळखला होता. साप्ताहिक बलवंतमधून ते आपल्या विहार उपहारगृहाच्या जाहिराती करत. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या हस्ते विहार उपहारगृहाच्या सभागृहाचे उद्घाटन झाले होते.

लोणी वितळले, पण…
‘विहार’च्या काऊंटरवर घडणारे अनेक प्रसंग रत्नागिरीत प्रसिद्ध होत असत. तेव्हा व्हॉटस् ऍप नव्हते तरी घडलेला प्रसंग क्षणार्धात थेट माळनाक्यापर्यंत जाऊन पोहचायचा. असेच एकदा एकाने रवा मसाला डोसा मागवला. ‘विहार’चा हा रवा मसाला टिपिकल शेट्टी डोशासारखा नाही. डोशावर मस्तपैकी लोण्याचा गोळा ठेवला. भाजी मात्र बटाटय़ाचीच. तर ग्राहकाने पहिला घास तोंडात टाकला तेव्हा लक्षात आले की भाजी आंबली आहे. त्याने काऊंटरवर तक्रार केली तेव्हा काऊंटरवाला थंडगारपणे म्हणाला, भाजी आंबलेली नाही. तुम्ही खाऊन बघितली तशी आम्ही पण खाऊनच बघतो. तुम्हाला काही पत्र पाठवून आमंत्रण दिले नव्हते… यंव आणि त्यंव… डोशावरील लोण्याचा गोळा वितळला, पण काऊंटरवाल्याचे मन काही वितळले नाही!

काळानुसार ‘विहार’ने बदल केला
वडा, भजी, मिसळबरोबरच शाकाहारी थाळी ही विहार उपहारगृहाची एक ओळख होती. जसजसा काळ बदलत गेला तसतसे काही बदलही विहार उपहारगृहाने स्वीकारले. गेल्या काही दिवसांत पंजाबी थाळीही आली. या उपहारगृहाच्या बाजूलाच विहारची मिठाई मिळायची. आंबावडी आणि काजूवडीसाठी विहार अतिशय लोकप्रिय होते. विहार डिलक्ससारख्या अत्याधुनिक हॉटेलची उभारणी केल्यानंतरही विहार उपहारगृहाचे अस्तित्व टिकून राहिले होते.

खूप वर्षे आम्ही विहार सुरू ठेवलं, पण अलीकडे विहार सांभाळायला कोणी नव्हतं. त्याची दुरुस्तीही आवश्यक होती. अलीकडे येणाऱया ग्राहकांना उपहारगृह सुस्थितीत आणि नीटनेटके हवे असते. या सर्व गोष्टींमुळेच आम्ही विहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असे संचालिका इंद्रायणी बबनराव पटवर्धन यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या