रत्नागिरी विनय देसाई व पुष्कराज इंगवले यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरीच्या विनय रमाकांत देसाई आणि पुष्कराज जगदीश इंगवले यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या ६ व्या वेस्ट झोन शुटींग चॅम्पियनशिप मध्ये केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर दोघांची ६२ व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये पुष्कराज याने चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदकाची कमाई करत मागील आठ वर्षांचा गुणांचा विक्रम मोडून नव्या विक्रमाची नोंद केली आहे. रत्नदुर्ग क्लबचे कोच व संचालक विनय देसाई हे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले असे खेळाडू आहेत ज्यांनी २०१७ च्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ३०० मीटर रायफल व २५ मीटर पिस्तूल या खेळ प्रकारांमध्ये आपली ठसा उमटवला आहे.  ६ व्या वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा यावेळी अहमदाबाद येथे पार पडली . गेल्या काही काळात रत्नागिरीतून शूटिंग क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केलेल्या रत्नागिरी च्या रत्नदुर्ग पिस्तूल अँड रायफल शूटिंग क्लबचे आठ खेळाडू या स्पर्धेत उतरले उतरले होते. या सर्व खेळाडूंनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.

कोकणात प्रथमच रत्नदुर्ग पिस्तूल अँड रायफल शूटिंग क्लब च्या निमित्ताने कोकणातील खेळाडूंना शूटिंग रेंज वर अत्याधुनिक गन्सच्या साहाय्याने सरावाची संधी मिळत आहे. या सर्वाचे श्रेय विक्रांत  देसाई यांचे आहे. कारण त्यांच्या कल्पनेतूनच या क्लबची निर्मिती झालेली आहे. विनय देसाई आणि पुष्कराज इंगवले यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली तयारी सुरु केली आहे.