अण्णांचं काय झालं, शेवंता कोण होती? हे सांगतोय रत्नागिरीचा लेखक राजू घाग

11

दुर्गेश आखाडे । रत्नागिरी

‘झी मराठी’ या वाहिनीवर सुरु असलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेची कंथा रत्नागिरीतील रंगकंर्मी राजू घाग यांनी लिहिली आहे. या मालिकेची कथा लिहिण्याचा राजू घाग यांचा पहिलाच अनुभव असून ही कथा सहज दिवाळी अंकात प्रसिध्द करण्यासाठी मी लिहिली होती. पण मालिकेसाठी त्याची निवड झाली या बाबत आनंद व्यक्त करताना या मालिकेतून खूप काही शिकायला मिळत असल्याचे त्यांनी आज रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत सांगितले.

दोन वर्षांपुर्वी गाजलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या वेळी अनेक अनुत्तरीत प्रश्न निर्माण झाले होते़ अण्णांचे काय झाले, शेवंता कोण होती, तिने काय केलं या सर्व प्रश्नांची उत्तरे रत्नागिरीतील लेखक राजू घाग प्रेक्षकांना सांगणार आहेत. राजू घाग यांच्याबरोबर लतिका सावंत या देखील लेखन करत आहेत.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा पूर्वार्ध पुन्हा नव्याने सुरु झाला आहे. या मालिकेची कथा ही राजू घाग यांनी लिहीली आहे. त्याविषयी राजू घाग म्हणाले की, कोकणातील भावकीच्या नातेसंबंधांवर एक कथा मला लिहायची होती आणि ती मी लिहिली. ही कथा मी दिवाळी अंक किंवा कोणत्यातरी वर्तमान पत्रात देण्यासाठी लिहीली होती. मात्र योगायोगाने ही कथा झी मराठी पर्यंत पोहोचली आणि रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या पूर्वार्धासाठी ती कथा अतिशय योग्य होती. या कथेतून मी अण्णांचे काय झाले किंवा शेवंती कोण होती असे अनेक प्रश्न यापुर्वीच्या रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या वेळी अनुत्तरीत राहिले होते. त्या प्रश्नांची उत्तरे या मालिकेतून दिली जात असल्यामुळे हा या मालिकेचा पूर्वार्ध आहे असे राजू घाग यांनी सांगितले. राजू घाग यांना मालिका लेखन करण्याची ही पहिलीच संधी मिळाली आहे. यापुर्वी त्यांनी कंथा, एकांकिका लिहिल्या आहेत.

प्रफुल्ल घाग गावचो पोलीस
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत घाग कुटूंबियाचेही ऋणानुबंध जुळले आहेत. कारण या मालिकेतील पोलीस अधिकाऱ्याची भूमिका राजू घाग यांचे बंधू प्रफुल्ल घाग यांनी केली आहे़ प्रफुल्ल घाग यांनी यापुर्वी अनेक मालिकांमधून भूमिका केल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करताना त्यांनी आपला खास मालवणी बाजही राखला आहे.