ॐ मित्राय नमः – सूर्यनमस्कार

रवी दीक्षित, योगतज्ञ

आज वर्षाचा पहिला दिवस. कायम आरोग्यपूर्ण राहण्यासाठी सूर्यनमस्कारासारखे साधन नाही. तेव्हा सूर्यनमस्काराने वर्षाचे स्वागत करूया.

सूर्य नमस्कार म्हणजे सूर्याला नमस्कार… हे एक योगासन आहे. शरीराला योग्य आकार देण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी सूर्यनमस्कार हा एक उत्तम उपाय आहे. मुळात सूर्यनमस्कारामुळे कार्डियो-व्हॅस्क्युलर व्यायामही होतो आणि आरोग्यासाठी ते खूपच फायद्याचेही आहे. त्यामुळे तुमच्याकडे जास्त वेळ नाही आणि तरीही तंदुरुस्त राहायचे असेल तर सूर्य नमस्काराशिवाय दुसरा पर्याय नाही. सकाळच्या वेळी सूर्यनमस्कार करण्याची योग्य वेळ मानली गेली आहे. सूर्यनमस्कार नेहमी १३ मंत्रांसह मोकळ्या हवेत केले पाहिजेत. ते करण्याआधी जमिनीवर चादर अंथरायची असते. त्यावर रिकाम्या पोटी सूर्यनमस्कार घातले तर त्यांचा पूर्ण प्रभाव शरीरावर पडतो.

सूर्यनमस्कार घालण्यासाठी योग्य स्थान, योग्य काळ, वय आणि योग्य शरीरयष्टी असणे गरजेचे आहे. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान या पाच प्रकारच्या नियमांचे पालन सूर्य नमस्कार घालताना केले पाहिजे. म्हणजेच सकाळी शौच केल्यानंतर आंघोळ आणि त्यानंतर सूर्यनमस्कार घातले पाहिजेत. ते घालताना कपडे घट्ट असता कामा नयेत. ते सैलसरच असावेत. नियमित सूर्यनमस्कार घालत असाल तर आहारही विशिष्ट घेतला पाहिजे. म्हणजेच चहा, कॉफी, तंबाखू, दारू, मांसाहार व्यर्ज्य करायला हवा. भोजनही सात्त्विक घ्यायचे.

सूर्यनमस्कार रिकाम्यापोटी केला तर जास्त चांगलं. मोकळ्या जागी, जेथे शुद्ध हवा असेल जागा निर्मळ असेल अशा नैसर्गिक वातावरणात सूर्यनमस्कार घातले पाहिजेत. अंगात ताप असताना किंवा नुकतीच शस्त्रक्रिया झाली असेल तर काळजी घेतली पाहिजे. ताप उतरल्यावर आणि शस्त्रक्रियेनंतर किमान ४ ते ५ दिवसांनंतरच सूर्यनमस्कार घातले तरी चालतील. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तेव्हाही हे सूर्यनमस्कार घालावेत. साधारणपणे सूर्याकडे तोंड करून सूर्यनमस्कार घातले पाहिजेत. त्यामुळे सूर्य उगवतो, जेथून तो स्पष्ट दिसतो अशा ठिकाणी पहाटे ६ ते ७ या कालावधीत सूर्यनमस्कार घालावेत. सूर्यनमस्कार घालताना मन एकाग्र असले पाहिजे. हे योगासन करताना आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ५ किंवा त्याखालील वयातील बालकांनी सूर्यनमस्कार घालू नयेत. सकाळी उठल्यावर सूर्यनमस्कार करण्याआधी किमान दोन ते तीन ग्लास पाणी प्यायला पाहिजे. काहीसा अशक्तपणा जाणवत असेल तर ताज्या लिंबाचा एक ग्लास सरबत घेता येईल. त्यावेळी पाणी कोमट असावे. त्यात एक चमचा मध घालून ते घ्यावे. एवढे लक्षात ठेवले तरी खूप झाले.

असा असावा क्रम

सूर्यनमस्कार हे एक गतिशील योगासन मानले जाते. त्यामुळे इतर आसने करण्याच्या आधी सूर्यनमस्कार घालायचे. असे केल्यामुळे शरीर सक्रिय होते आणि शरीरातून आळस, झोप आणि थकवा दूर होतो. मात्र सूर्यनमस्कार घालताना एक काळजी घेणे गरजेचे आहे. ते ठरावीक संख्येतच असले पाहिजेत. शरीरावर अनावश्यक जोर दिल्यास त्रास होईल. कोणताही आजार असेल तर योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच सूर्यनमस्कार घातले पाहिजेत.

हेच ते सूर्य नमस्कार मंत्र

सूर्यनमस्कार किमान तेरा वेळा घातले पाहिजेत. त्या प्रत्येक वेळी एकेक मंत्र म्हणायचा असतो. प्रत्येक वेळी सूर्याचे मंत्र म्हणत सूर्यनमस्कार घातले तर ते जास्त फायद्याचे ठरतात. हे मंत्र पुढीलप्रमाणे…

> ॐ मित्राय नमः

> ॐ रवये नमः

> ॐ सूर्याय नमः

> ॐ भानवे नमः

> ॐ खगाय नमः

> ॐ पूष्णे नमः

> ॐ हिरण्यगर्भाय नमः

> ॐ मरीचये नमः

> ॐ आदित्याय नमः

> ॐ सवित्रे नमः

> ॐ अर्काय नमः

> ॐ भास्कराय नमः

> ॐ सवितृ सूर्यनारायणाय नमः

सूर्यनमस्काराचे फायदे

> सूर्यनमस्कारामुळे शरीरातील सर्व अवयव बलवान आणि  निरोगी होतात.

> मेरूदण्ड आणि कंबर लवचीक होते. मनाला शांती मिळते.

> मधुमेह, मोटापा, थायरॉइड या विकारांमध्ये खूपच लाभ होतो.

> आत्मविश्वास वाढतो. चेहरा तेजस्वी, वाणी सुमधुर होते.

> गळ्याचे सर्व विकार नष्ट होतात. त्यामुळे आवाज चांगला होतो.

> महिलांच्या मासिक पाळीच्या सर्व समस्या दूर होतात.

> रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे चेहरा तुकतुकीत होतो.

> शरीरातून अनावश्यक चरबी कमी होते. फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते.

> स्मरणशक्ती वाढते. व्हिटॅमीन-डी मिळते. त्यामुळे हाडे मजबूत होतात.

> शरीरात रक्तप्रवाह जोमाने होतो. त्यामुळे ब्लडप्रेशरसारख्या समस्या दूर होतात.

> केस पांढरे होणे, गळणे, कोंडा होणे या समस्या दूर होतात.

> रागावर नियंत्रण ठेवता येते. त्वचारोगही कमी होतात.

> पचनक्रिया सुधारून मन एकाग्र होऊ शकते.