रायगडच्या पालकमंत्रीपदावरून प्रकाश मेहतांना डच्चू

सामना प्रतिनिधी । अलिबाग

शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाला वारंवार मारलेली दांडी असो वा सावित्री दुर्घटनेवेळी सामाजिक भान विसरून काढलेली सेल्फी, नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकणारे भाजपचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना रायगडच्या पालकमंत्रीपदावरून डच्चू देण्यात आला आहे. पालकमंत्री असूनही गेल्या तीन वर्षांत केलेला निक्रिय कारभारच त्यांना भोवला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खुद्द जिल्ह्यातील भाजपच्याच पदाधिकाऱयांनी याविरोधात फिल्डिंग लावली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेहतांना हा जबरदस्त तडाखा मानला जात आहे. दरम्यान रायगडच्या पालकमंत्रीपदी अन्न व नागरीपुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती केली आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सध्या प्रकाश मेहता अडचणीत आले आहेत. त्यातच रायगड जिह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱयांकडून वाढलेल्या तक्रारींची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आज मेहता यांची पालकमंत्रीपदावरून उचलबांगडी केली. मेहता हे रायगडचे पालकमंत्री असूनही अनेक महिने जिल्ह्याकडे फिरकतच नव्हते. जिल्हा नियोजन समिती अथवा अन्य महत्त्वाच्या बैठकांनाही नेहमीच दांडी मारत असल्याने विकासाची अनेक कामे खोळंबली होती. संतापजनक म्हणजे स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनासारख्या महत्त्वाच्या सोहळय़ांकडेही त्यांनी अनेकदा पाठ फिरविली होती. याचाच दणका त्यांना बसला आहे.

क्या होता है, चलता है…

सावित्री नदीवरील दुर्घटनेने संपूर्ण देशात हडकंप माजला असताना घटनास्थळी गेलेले प्रकाश मेहता सेल्फी काढण्यात मग्न होते. याबाबत प्रसारमाध्यमांनी जाब विचारताच रायगडकरांमध्ये मेहता व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांना धक्काबुकी केली. क्या होता है, चलता है.. अशा पद्धतीचे त्यांचे नेहमीचे वागणे असल्याने रायगडकरांमध्ये त्यांच्याविषयी रोष होता.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमालाही दांडी

गेल्याच आठवडय़ात कर्जत येथे झालेल्या कार्यक्रमाला खुद्द मुख्यमंत्री येऊनही प्रकाश मेहतांनी दांडी मारली. ही बाब काही पदाधिकाऱयांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्याचे बोलले जात आहे.