कपाशीचा दर घसरला

सामना ऑनलाईन। धुळे

भाद्रपदातील कडाक्याच्या उन्हामुळे कपाशीची बोंडे फुटू लागली असून शेतकऱयांकडून कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. पण बाजारात कपाशीला केवळ तीन हजार रुपये दर मिळत आहे. या दरामुळे शेतकरी नाराज आहे. गेल्या वर्षी कपाशीला प्रतिक्विंंटल चार हजार पाचशे रुपये दर होता. वाढती महागाई लक्षात घेता गेल्या वर्षीच्या कपाशीच्या दरात यंदा वाढ अपेक्षीत असताना प्रतिक्विंटल दीड हजाराची घट झाली आहे. सरकारने हमीभाव जाहीर करावा अशी मागणी शेतकऱयांनी  केली आहे.

जिह्यातील बहुसंख्य शेतकरी नगदी पीक म्हणून कपाशीचे उत्पन्न घेतात. यंदा पिकाची गरज असताना पावसाने दडी मारली आहे. प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱयांनी कपाशी जगविली. आता भाद्रपदाचे  ऊन पसरू लागताच बोंडे फुटून कापूस मोकळा होत आहे. त्यामुळे शेतकऱयांना कपाशीच्या वेचणीला सुरुवात करावी लागली आहे. कापूस वेचणीसाठी शेतमजूर महिला किमान १५० रुपये प्रतिदिवस मागतात.

 जिह्यातील अल्पभूधारक शेतकऱयांनी कपाशीच्या वेचणीला सुरुवात केली आहे. काही शेतकऱयांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कपाशी विक्रीचा निर्णय घेतला आहे. पण सध्या बाजारात तीन हजार रुपये प्रतिक्विंटल इतकाच दर आहे. प्रत्यक्षात कपाशीच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित करून व्यापारी पुन्हा दर कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कापूस उत्पादक सामान्य शेतकरी अडचणीत आला आहे. सरकारने कापूस उत्पादनावरील खर्च लक्षात घेऊन हमीभाव जाहीर करावा आणि शेतकऱयांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी वरखेडी येथील कापूस उत्पादक शेतकरी रवींद्र माळी यांनी केली.