महागाई वाढल्याची आरबीआयची कबुली

देशात महागाई वाढल्याची कबुली खुद्द आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीच दिली आहे. कडधान्ये, डाळी तसेच भाज्यांच्या किंमती प्रचंड वाढल्याने जुलै 2023 पर्यंत किरकोळ महागाईचा दर तब्बल 7.44 टक्क्यांवर गेल्याचे शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. दरम्यान, महागाई 4 टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या किंमतीत काही प्रमाणात घट होत असल्याचे दास यांनी सांगितले. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या डायमंड ज्युबिली लेक्चर या कार्यक्रमात ते बोलत होते.

आर्थिक धोरण म्हणजे खड्डय़ांतून गाडी चालवण्यासारखे

मॉनिटरी पॉलिसी म्हणजेच आर्थिक किंवा पतधोरणाबाबतही दास यांनी भाष्य केले. आर्थिक नियोजन करणे म्हणजे खड्डे आणि स्पीड ब्रेकर असलेल्या रस्त्यांवरून गाडी चालवण्यासारखे आहे. मॉनिटरी पॉलिसीचा विचार करताना आपल्याला नेहमी मागेही पाहिले पाहिजे. त्यामुळे आर्थिक नियोजनात चुका होण्याची भीती कमी असते याकडेही दास यांनी लक्ष वेधले.