‘त्रिपुरा मॉडेल’चा खरा चेहरा

116

‘त्रिपुरा’ हे हिंदुस्थानातील ईशान्य भागातील सर्वात छोटेखानी ‘सीमावर्ती’ राज्य. मुळात स्वातंत्र्यानंतर ईशान्य हिंदुस्थानकडे देशाने कधी गांभीर्याने पाहिलेच नाही. १९६२च्या चिनी आक्रमणानंतर सुरक्षेच्या दृष्टीने स्थिती थोडी पालटली. मात्र पायाभूत सुविधा व राजकीय महत्त्व याबाबतीत ईशान्य हिंदुस्थान आजही दुर्दैवीच म्हणावा लागेल. राष्ट्रीय प्रसार माध्यमांतील बातम्या याची साक्ष देतील. वाजपेयी सरकारच्या ‘लूक ईस्ट’मुळे ईशान्य हिंदुस्थानातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मधल्या १० वर्षांच्या काँग्रेस राजवटीच्या औदासीन्यामुळे पूर्वोत्तरात प्रचंड नैराश्य पसरले होते.

२०१४ च्या दिल्लीतील परिवर्तनामुळे मात्र ईशान्य हिंदुस्थानात एक वेगळीच चैतन्याची लहर उसळली. मोदी सरकारच्या ‘ऍक्ट ईस्ट’मुळे जनतेला विकासाची प्रचीती येऊ लागली. आसाम, अरुणाचल प्रदेश व मणिपूर राज्यांतील सत्तापरिवर्तनाने एकूण सबंध पूर्वोत्तरात परिवर्तनाचे वारे वाहू लागले, मग केवळ ‘त्रिपुरा’ याला अपवाद कसा राहील?
गेली २४ वर्षे मार्क्सवादी पक्षाची लाल राजवट त्रिपुरावर एकहाती सत्ता गाजवतेय. पैकी १९ वर्षे माणिक सरकार सलग मुख्यमंत्री आहेत. प्रसार माध्यमांनी त्यांची रंगवलेली ‘गरीब व साधेसुधे’ मुख्यमंत्री ही प्रतिमा, विशेषतः ‘स्वच्छ प्रतिमेचा’ नेता ही त्यांची छबी त्यांच्या विरोधकांनाही त्यांना साधा प्रश्न विचारायचेही धाडस करू देत नाही. याचा सरळ अर्थ या आधुनिक ‘कार्ल मार्क्स’च्या शोषितांच्या राज्यात प्रजा नक्कीच स्वर्गसुखात असली पाहिजे.

नेमकी वस्तुस्थिती काय आहे?

त्रिपुराच्या नेमक्या सद्यस्थितीचा वस्तुनिष्ठ परामर्श ज्येष्ठ पत्रकार दिनेश कानजी यांनी आपल्या पहिल्यावहिल्या ‘त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा माणिक सरकार’ या आगामी पुस्तकात घेतला आहे. स्वानुभव व ठोस पुरावे यावर आधारित ‘माणिक बाबूं’च्या दोन दशकांच्या काळय़ाकुट्ट राजवटीचा अक्षरशः पर्दाफाश लेखकाने केला आहे. एकूण २४ प्रकरणे व ४ मुलाखतीतून त्रिपुराची भौगोलिक ओळख, राजकीय इतिहास, माणिकबाबूंचे राजकीय षड्यंत्र, विरोधकांना ज्यात स्वपक्षीयही आले, संपविण्याची कुटील जीवघेणी कारस्थाने, संपूर्ण राज्य प्रशासनाला पक्षाची बटिक बनविणे, केंद्राच्या योजनांचे हजारो कोटी रुपये गायब करणे, मादक द्रव्यांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीला वरदहस्त, धार्मिक आतंकवादी संघटनांशी छुपी हातमिळवणी… वाचकाला सुन्न व अंतर्मुख करायला लावणारे हे पुस्तक आहे. आपल्या ओघवत्या शैलीने वाचकाला खिळवून ठेवण्यात लेखक यशस्वी ठरला आहे.

मार्क्सवादाच्या समानता व शोषणविरहित समाजरचनेचा बुरखा टराटरा फाडताना सामान्य नागरिकापासून ते काँग्रेसच्या माजी राज्य प्रवक्त्यापर्यंत लेखकाने काढलेल्या साक्षी, तारीखवार व सरकारी आकडेवारीसकट दिलेले ठोस पुरावे यातून लेखकाचा दांडगा जनसंपर्क व सत्यावर आधारित केलेली वस्तुनिष्ठ मांडणी याची प्रचीती येते व वाचक मार्क्सवादाने त्रिपुराला ‘रक्तरंजित सर्वनाश’ दिला या निष्कर्षाप्रत येतो हे पुस्तकाचे सर्वात मोठे यश आहे.

दुबळ्या काँग्रेसच्या लटक्या व अगतिक विरोधी पक्षाची पोकळी भाजपने गेल्या तीन वर्षांत आपल्या अथक परिश्रमाने कशी भरून काढली व त्रिपुराचा गेली २४ वर्षे अभेद्य असणारा गड फेब्रुवारी २०१८च्या विधानसभा निवडणुकीत असा जमीनदोस्त होण्याच्या तयारीत आहे हे सप्रमाण लेखकाने दाखवून दिले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष बिप्लव देव व प्रभारी सुनील देवधर यांच्या मुलाखती त्रिपुरातील सत्तापरिवर्तनाची दृढ ग्वाही देणाऱ्या, ‘आजचा’ त्रिपुरा समजावून देणाऱ्या आहेत.

मार्क्सवाद्यांच्या हिंसक राजकारणाचे बळी केवळ केरळ व पश्चिम बंगालच नसून त्रिपुरात ते अधिक किंबहुना कितीतरी पटीने आहे हे अधिक प्रभावी व जिवंत रीतीने पटवून देता आले असते. ले. जनरल (निवृत्त) दत्तात्रय शेकटकरांची प्रस्तावना पुस्तकाला लाभणे हेच खरं प्रशस्तिपत्र आहे. ‘माणिकबाबूं’चा खरा चेहरा पहिल्या प्रथम मराठी वाचकांपर्यंत या पुस्तकातून पोहोचत आहे.

त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा
लेखक – दिनेश कानजी
प्रकाशक – चंद्रकला प्रकाशन
पृष्ठs – १५१, मूल्य – १६० रुपये

आपली प्रतिक्रिया द्या