विद्यार्थ्याचे शिक्षकाने केस ओढून धक्काबुक्की केल्याच्या सीसीटीव्हीचे सत्य

प्रकाश वराडे, सिल्लोड

सिल्लोडमधील एका शाळेतील सीसीटीव्हीची दृश्य सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. या सीसीटीव्हीमध्ये शाळेचा मुख्याध्यापक एका विद्यार्थ्यावर जोरजोरात ओरडत असून त्याचे केस खेचत असल्याचं दिसतंय. दृश्यात दिसणाऱ्या हा विद्यार्थी १०वी च्या वर्गातील असून त्याच्या वडीलांनी म्हणजेच प्रवीण मनवर यांनी जी.ए.शहा शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

राहुल देव भगत असं मुख्याध्यापकाचं नाव असून त्यांच्या विरोधात युनिफॉर्म घालून न आल्याने शाळेमध्ये दमदाटी करणे आणि धक्काबुक्की करणे असा आरोप करत हा गुन्हा दाखल झाला. या घटनेनंतर आपला मुलगा मानसिक तणावाखाली असल्याचं पालकांचं म्हणणं आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये हीच बाजू दाखवण्यात आली होती. मात्र सीसीटीव्ही स्पष्ट ऐकल्यास मुख्याध्यापक हा त्या मुलाला सातत्याने ‘तू मला बाहेर काढतोस का ? कसं ते मी बघतो !’असं म्हणत असल्याचं ऐकायला येत आहे. त्यामुळे हा प्रकार काहीतरी वेगळा असावा हे जाणवायला लागलं. आम्ही मुख्याध्यापकांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या विद्यार्थ्याने त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे, तो विद्यार्थी उद्धट स्वभावाचा आहे. त्याच्या विरोधात एका शिक्षीकीने लेखी तक्रार देखील केली होती. मुख्याध्यापक शाळेची पाहणी करत असताना ते या विद्यार्थ्याच्या वर्गात आले, त्यांनी स्वत: काही प्रश्न या मुलांना विचारले. त्यांनी सगळ्या मुलांना भविष्यकाळात एक वाक्य लिहायला सांगितलं. या विद्यार्थ्याने ‘तुला बाहेर काढेन’ असं वाक्य लिहलं. या वाक्यामुळे आपला पारा चढल्याचं राहुल देव यांनी म्हटलं आहे. धक्काबुक्कीचा प्रकार झाल्यानंतर या विद्यार्थ्याला लेखी स्वरूपात माफी मागायला सांगण्यात आलं. त्या पत्रानंतर वर्गात सगळ्या विद्यार्थ्यांसमोर या मुलाने त्याच्या चुकीची माफी मागितली आहे असं म्हणत त्याचं कौतुक देखील केलं. शाळा सुटेपर्यंत वातावरण शांत होतं, घरी गेल्यानंतर हा प्रकार सुरू झाल्याचं मुख्याध्यापकाचं म्हणणं आहे.  विद्यार्थ्याचे पालक बऱ्याच लोकांसोबत शाळेमध्ये येऊन हुज्जत घालून गेल्याचंही मुख्याध्यापकांनी म्हटलं आहे. पोलिसांपर्यंत हा प्रकार गेल्यानंतर त्यांनी शिक्षक आणि पालकांसोबत एक बैठक घ्यायला सांगितली होती. त्या बैठकीमध्ये मुख्याध्यापकांनी जर काही चुकलं असेल तर माफी मागतो, मात्र वर्गात झालेला प्रकार हा चुकीचा होता असं सगळ्यांना सांगितलं.

केस ओढले हे कबूल करतानाच मुख्याध्यापकांचं म्हणणं आहे की मी त्याच्यावर हात उगारलेला दिसत असला तरी मी त्याला मारलेलं नाही.  विद्यार्थी चुकीचा वागत असेल आणि जर त्याला शिक्षा केली नाही, किंवा ओरडलं नाही तर मग शिकवायचं कसं असा प्रश्न या घटनेनंतर याच शाळेतील शिक्षकांनी आपल्याला विचारल्याचं मुख्याध्यापकांनी म्हटलं आहे.