उद्ध्वस्त व्यावसायिकाने बायकोला गोळ्या घातल्या, २ मुलं थोडक्यात वाचली

सामना ऑनलाईन, बंगळुरू

धंद्यात सोसाव्या लागलेल्या प्रचंड नुकसानामुळे एका व्यावसायिकाने त्याच्या बायकोची गोळ्या घालून हत्या केली. या व्यावसायिकाने मुलांवरही गोळ्या झाडल्या मात्र सुदैवाने ही दोन्ही मुलं वाचली आहेत. एचके गणेश असं या व्यावसायिकाचे नाव असून त्याची कहाणी हादरवून टाकणारी आहे.  कर्नाटकात गणेश यांच्या कमीतकमी ४ जागा आणि घरं आहेत, ज्यामध्ये एका रिसॉर्टचाही समावेश आहे. कॉफीच्या मळ्याचा मालक असलेल्या गणेशने त्याचा हा मळा विकून टाकला आणि बांधकाम व्यवसायात उतरायचं ठरवलं.

बांधकाम व्यवसायात गणेशला तोटा सहन करावा लागला, ज्यामुळे त्याने लोकांकडून कर्ज घ्यायला सुरुवात केली. परतफेड वेळेत करता न आल्याने त्याला कर्जदार त्रास द्यायला लागले होते. यामुळे गणेश आणि त्याची बायको सहाना यांच्यात भांडणं व्हायला लागली. हा त्रास सहन करण्याच्या पलिकडे गेल्याने त्याने घरातल्या सगळ्यांना ठार मारून आत्महत्या करायचं ठरवलं होतं.

गणेशने त्याच्या बायकोला गोळ्या घालून ठार मारलं, त्यानंतर त्याने मुलांना शाळेतून घेतलं आणि त्याच्या रिसॉर्टवर घेऊन गेला. गणेशची एकूण तीन मुलं असून, यातील मोठा मुलगा हा दिव्यांग आहे. दुसरा मुलगा सिद्धांत आणि दत्तक घेतलेली मुलगी साक्षी हे दोघे  रिसॉर्टवर खेळत असताना गणेशने त्यांच्यावर गोळ्यात झाडल्या. सिद्धांतने बंदुकीवर हात ठेवल्याने त्याच्या पंज्याला आणि मणक्याला इजा झाली आहे. साक्षीच्या पोटात गोळी लागल्याने ती देखील जखमी झाली.

मुलांवर गोळ्या झाडल्यानंतर गणेशला अपराधीपणाच्या भावनेनं घेरलं. यानंतर त्याने आपल्या मुलांना वाचवायचं ठरवलं. त्याने गाडी काढली आणि सलग १४ तास चालवत बणिगिरे गाठायचं ठरवलं. रस्त्यात मुलांनी पाणी मागितल्याने त्याने पाण्याची बाटली विकत घ्यायला गाडी थांबवली. सहानाच्या हत्येनंतर स्थापन करण्यात आलेल्या पोलिसांच्या पथकांनी रस्त्यात थांबलेली ही गाडी ओळखली आणि त्यांनी गाडीला घेराव घातला. गणेशला अटक करतानाच मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. साक्षी हिची प्रकृती आता स्थिर आहे मात्र सिद्धांतची प्रकृती चिंताजनक आहे.