का आहे केसीआर यांचा 6 लकी नंबर?

सामना ऑनलाईन । हैदराबाद 

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा विधानसभा भंग करण्याचा प्रस्ताव राज्यपालांनी स्वीकारला. या निर्णयासाठी त्यांनी 6 तारीखच निवडण्याचे कारण केवळ योगायोग नाही.

रविवारी केसीआर यांनी विधानसभा भंग करण्याचे संकेत दिले होते. या निर्णयाची घोषणा करण्यासाठी ते 6 सप्टेंबरपर्यंत थांबतील अशी माहिती त्यांच्या सहकर्मचार्‍यांनी दिली. केसीआर यांच्यासाठी 6 हा लकी नंबर आहे. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या घटनेसाठी त्यांनी सहा अंकाशी निगडीत निर्णय घेतला आहे.

केसीआर यांचा ज्योतिष शास्त्रावर मोठा विश्वास आहे. त्यांचा लकी नंबर 6 असून त्यांची गाडी, फोन आणि प्रत्येक मोठ्या निर्णयावेळी 6 क्रमांकाला धरूनच निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.

केसीआर यांनी तेलंगाणाच्या मुख्यमंत्रिपदी 2 जून रोजी 12 वाजून 57 मिनिटांनी शपथ घेतली होती. 12.57 चा योग 15 आहे आणि 1 अधिक 5 असे 6 होतात. त्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी शपथ घेतली. काँग्रेस आमदार वन्नापार्थी चिन्ना रेड्डी यांनी केसीआर यांच्या लकी नंबरबद्दल माहिती देताना म्हटले की “6 क्रमांकाला धरून केसीआर इतके आग्रही असतात की एकदा जहांगीर पीर दर्ग्यात त्यांनी 51 बकर्‍या भेट दिल्या होत्या, पक्षाच्या समन्वय समितीतही 15 सदस्य आहेत तर जिल्हा स्तरावरील समितीतही 24 सदस्यांच्या समावेशा आहे. राज्य समितीतही 42 सदस्य आहेत.” या सगळ्या आकड्यांची बेरीज ही ६ होते.