काँग्रेस नेते खरगे यांना शिष्याचेच जबर आव्हान

1

सामना ऑनलाईन । कलबुर्गी

सोळाव्या लोकसभेत काँग्रेस नेतेपदाची धुरा वाहणारे मल्लिकार्जुन खरगे यांच्यापुढे त्यांच्या कलबुर्गी पूर्वाश्रमीचा (गुलबर्गा) या परंपरागत लोकसभा मतदारसंघात त्यांचाच शिष्य आणि माजी काँग्रेस आमदार उमेश जाधव यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. काँग्रेसमधून आपल्या गाळाला लावत आमदार जाधव यांना भाजपने कर्नाटकच्या या मतदारसंघात तिकीट दिले आहे. त्यामुळे आतापर्यंत एकही निवडणूक न ठरणाऱ्या खरगेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

कलबुर्गी हा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघातील जातीय समीकरणे पाहत भाजपने खरगे यांच्या शिष्यालाच काँग्रेसमधून पक्षात आणून गुरूविरुद्धच निवडणूक रिंगणात उतरवले आहे. भाजपच्या तिकिटावर यंदा लोकसभा निवडणूक लढवणारे जाधव बंजारा (लमाणी) समाजाचे आहेत. कलबुर्गीत लमाण समाजाची 1 लाख 80 हजार मते आहेत. शिवाय अन्य दलित समाजाची 2 लाख 70 हजार मते आहेत.